सोमवार, ६ जून, २०२२

द मॅजिशियन

कॉम टोईबिन या आयरिश लेखकाची थोमास मान याच्या चरित्र व वाङ्मयाचा वेध घेणारी ' द मॅजिशियन' ही कादंबरी नुकतीच वाचली .मी  नोबेल पारितोषिक विजेत्या थोमास मान या जर्मन लेखकाने लिहिलेले काहीही वाचलेले नाही तरीही ही कादंबरी मला अतिशय आवडली हे विशेष.मला ते ललित चरित्र आहे असे म्हणावेसे वाटते. एका बहुप्रसू लेखकाने कल्पनेच्या, अभ्यासाच्या आणि उपलब्ध सर्व साहित्याच्या साहाय्याने दुसऱ्या लेखकाच्या  अंतरंगात शिरून ते वाचकांना जणू उलगडून दाखवले आहे असा अनुभव देणारे हे पुस्तक सर्वांनी  अवश्य वाचावे .
मान जर्मनीमध्ये जन्मला .वडील श्रीमंत व्यापारी आणि सिनेटर .आई कलासक्त , ब्राझिलमध्ये जन्मलेली आणि तेथील वातावरण न विसरु शकलेली , मनाने अजून ब्राझीलमध्येच जगणारी त्यामुळे नवऱ्याच्या नातेवाईकांना परकी, नकोशी वाटणारी .वडिलांच्या मृत्यूनंतर श्रीमंती ओसरली.थोमास आणि त्याचा भाऊ दोघांनाही लेखक होण्याची इच्छा होती.थोमासला आईचा म्हणावा तसा पाठिंबा मिळाला नाही पण त्याला सुरुवातीपासून प्रसिद्धी, यश मिळाले.त्यातूनच त्याचे लग्न जुळले.ज्यू  पण जवळ जवळ निधर्मी अशा कुटुंबात जन्मलेली त्याची बायको आणि तिचा जुळा भाऊ क्लॉज यांच्यात खूप , जगावेगळी वाटेल अशी जवळीक असते.लग्नानंतर मानची पहिली प्रसिद्ध झालेली आणि गाजलेली कथा जुळ्या बहिण भावांच्या अशाच जोडीवर होती.  हिटलरच्या   उदयानंतर आणि नोबेल पारितोषिक मिळाल्या नंतर मानला जर्मनी सोडावा लागला , त्याला रुझवेल्ट अध्यक्ष असतांना अमेरीकेत प्रथम आश्रय आणि नंतर नागरिकत्व  मिळाले त्याची कथा विलक्षण गुंतागुंत असलेली आणि रंजक आहे.दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला अमेरिकन जनतेचा त्यात पडण्यास विरोध होता.नंतर ते चित्र बदलले .हा बदल होत असतांना मानला अमेरिकन जनतेच्या मूडशी जुळवून घेण्यात 'वॉशिंग्टन पोस्ट' चे मालक युजिन मेअर आणि त्यांच्या पेक्षाही त्यांच्या बायकोची मदत आणि मार्गदर्शन कसे झाले ते वाचलेच पाहिजे असे आहे. महायुद्ध संपल्यावर  पूर्व जर्मनीला मानने भेट देऊ नये म्हणून अमेरिकन सरकारच्या दबावाला न जुमानल्यामुळे अमेरिकेला त्याच्याविषयी वाटणारे प्रेम आटले.शेवटी त्याने स्विट्झरलंडला स्थाईक होण्याचे ठरवले इथे पुस्तक संपते.
दोन भावांमधील वैचारिक मतभेद, लेखक म्हणून स्पर्धा ,युरोपातले राजकारण, यशस्वी बापाची तितकीशी यशस्वी नसलेली आणि काहीशी बेजबाबदार मुले , सुखी समाधानी वैवाहिक आयुष्य वाट्याला येऊनही मानला असणारे समलैंगिक संबंधांचे आकर्षण या सर्व गोष्टी आणि त्याच्या महत्त्वाच्या पुस्तकांची निर्मितीप्रक्रिया या सर्व गोष्टी योग्य प्रमाणात एकजीव  झाल्यामुळे रसमयी बनलेली ही कथा प्रत्येकाने चवीने वाचावी अशी झाली आहे.

रविवार, ५ जून, २०२२

अहा ते सुंदर दिन हरपले -- शांता शेळके

अहा ते सुन्दर दिन हरपले

अहा ते सुन्दर दिन हरपले
मधुभावाचे वेड जयांनी जीवाला लाविले
दृष्टी होती मुग्ध निरागस
अन्तर होते प्रेमळ लालस
चराचरांतुन सौन्दर्याचे किरण तदा फांकले
शशिला होती अपूर्व सुषमा
आणि नभाला गहन नीलिमा
सुखोष्ण गमले प्रभातरविचे कर तेव्हां कोवळे !
तृणपर्णातुन, रानफुलांतुन
जललहरींतुन वा ताऱ्यांतुन
स्नेहलतेचे अद्भुत लेणे सहज तदा लाभले
मृदुल उमलल्या कलिका चुंबित
पुष्पदलांना उरि कवटाळित-
संध्येचे मधुरंग बदलते हर्षभरें निरखिले!
अवनी गमली
अद्भुतअभिनव
जिथें सुखाविण दुजा न संभव
घरि वा दारी वात्सल्याचे मळे नित्य बहरले
आतां नुरलें तें संमोहन
विषष्ण गमतें अवघे जीवन
बाल्य संपतां आज जगाचे रूप सर्व बदललें!
अहा ते सुंदर दिन हरपले

शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

इंग्लीश

अकरावीच्या शेवटी बोर्डाच्या परीक्षेला माझा नंबर एका कॉन्व्हेंट शाळेत आला.भव्य इमारत आणि त्याहूनही इंग्लीश बोलावे लागणार याची भीती परीक्षेच्या काळजीपेक्षा जास्त भेडसावत होती.आई किंवा वडील मुलाला परीक्षाकेंद्रावर सोडायला येण्याची पद्धत सुरु झाली नव्हती.माझ्या मोठ्या भावाच्या शब्दात, ' रानात झाडे आपोआप वाढतात तशी मुले आपोआप वाढतात 'असा बहुतेक पालकांचा समज होता.आठवीत एबिसिडी शिकायला सुरुवात केलेले, चाळीच्या इमारतीत भरणाऱ्या शाळेत जाणारे आणि कनिष्ठ मध्यमवर्गात मोडणारे आम्ही कशा भांबावलेल्या मन:स्थितीत होतो याची कल्पनाच करावी लागेल.
आपल्या बाकावर डकवलेला क्रमांक आणि हॉल तिकिटावर असलेला क्रमांक एकच असल्याची तिनतिन वेळा खात्री करून घेतली होती.बेल झाली आणि जीवघेण्या शांततेत स्कर्टब्लाऊज घातलेल्याआणि बॉबकट केलेल्या  सुपरवायजर आल्या. हॉलतिकिट पाहण्याचा कार्यक्रम न बोलताच पार पडला.पुरवणी मागण्यासाठी सुद्धा बोलायचा प्रसंग आला नाही.नुसते उभे राहिले की मॅडम अगोदरच सही करून ठेवलेली पुरवणी देत होत्या.इंग्रजी बोलण्याचे मरण अजून ओढवले नव्हते.माझा पेपर वेळेपूर्वी झाला .मी उभा राहिलो.मॅडणी बाकाजवळ आल्या. मी त्यांना मोठ्या प्रयत्नाने जुळवलेल्या इंग्रजीत म्हटले," I want a rope". त्यांनी टेबलावर ठेवलेला दोरा आणला आणि शुद्ध मराठीत हळू आवाजात म्हणाल्या " याला थ्रेड किंवा स्ट्रिंग म्हणतात."त्यांच्या पेहरावामुळे, त्याहीपेक्षा बॉबकटमुळे त्यांच्याशी इंग्लीशशिवाय कोणत्याही भाषेत बोलणे( अलिकडच्या शब्दात,  संवाद साधणे) शक्य नाही असे मला वाटले होते .

रविवार, १७ एप्रिल, २०२२

प्रार्थना रघुनाथाची

भगवन्नाम्नि रुचिर्नास्ति चित्तं विषयलोलुपम्

तथापि परमार्थेच्छा सिद्धिं नयतु त्वत्कृपा

ईषणात्रयमुक्तं मे मानसं स्यात् कदा गुरो

कदा नामामृतस्वादलोलुपा रसना भवेत्

भुञ्जानस्य तु प्रारब्धं न धैर्यं मम नश्यतु

स्मरणं दिव्यनाम्नस्ते प्रसादयतु मानसम्

शुचीनां श्रीमतां गेहे अन्यस्मिन् जन्मनि प्रभो

तव सेवारतं सफलं आयुर्मे देहि निश्चितम्

श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं च सद्गुरुं रघुनाथ त्वाम्

नमामि मनसा भक्त्या भवबन्धनिवारकम्

गुरुवार, १४ एप्रिल, २०२२

अंगुष्ठमात्र चरित्र

पुढारलेल्या देशात ,निर्दोष आणि परिपूर्ण व्यवस्थेत आणि चांगल्या कुटुंबात मी जन्मलो/ ले असतो/ते तर मी काय केले असते त्याची कल्पना सुद्धा तुम्हाला करता येणार नाही !आता मात्र मी या सबबींचे च्युइंगम चघळत कालक्षेप करत आहे !
--- अनेकां/ कींच्या आत्मकथनांचा अंगुष्ठमात्र सारांश .

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

माधव मनोहर

माधव मनोहर हे केवळ त्यांच्या मुलांचेच नव्हे तर कितीतरी युवायुवतींसाठी ' पपा' होते.त्यांचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे पितृतुल्य होते.खऱ्या अर्थाने ते  मराठी साहित्यव्यवहारातील 'बापमाणूस'  होते.वाङ्मयचौर्याचा वेध घेऊन कुणाच्या रागलोभाची पर्वा न करता त्या लेखकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे 'फौजदार' होते.त्यांच्या आधीच्या पिढीतील बहुतेक मराठी साहित्यिकांशी प्रत्यक्ष ओळख असल्याने ते एका समृद्ध परंपरेचा आणि नव्या पिढीने सुरु केलेल्या परिवर्तनाच्या हालचालीचा, नव्या प्रवाहांचा दुवा( लिंक) ठरले.जुन्या नव्या सर्वांना हवेसे वाटणारे ,सोबत मधील पंचम , नवशक्तिमधील ' शब्दांची दुनिया ' या सदरांतील त्यांच्या लिखाणामुळे प्रत्यक्ष परिचय नसलेल्यांना ते ' शिष्ट', 'आढ्यतेखोर' वाटत. त्यात पुन्हा त्यांची ' शालप्रांशुः, वृषस्कन्ध:' अशी बलदंड दिसणारी शरीरयष्टी आणि बंगाली पद्धतीने नसलेले धोतर आणि झब्बा हा वेष आणि सिगार ओठात ठेवून आजुबाजुच्या लोकांकडे  लक्ष न देत एक प्रकारच्या बेफिकिरपणे चालत जाण्याची  त्यांची अशी खास ढब हे सर्व त्यांच्या प्रतिमेत भर टाकणारे बाह्य , फसवे दर्शन .पण प्रत्यक्ष ओळख झाल्यावर मात्र त्यांना सर्व पपा का म्हणतात ते न सांगता कळत असे. वयाने मोठे असले तरी आपल्यापेक्षा कितीही लहान असलेल्या मुलामुलींच्यात ते सहज मिसळत असत.जनरेशन गॅप त्यांना किंवा त्यांच्याशी ओळख झालेल्या कोणालाही कधी जाणवत नसे.
त्यांच्या लिखाणात ऐसपैस , रंजक पाल्हाळ असे आणि त्यांच्या विशिष्ट लकबींचि माफक थट्टाही अनंता भावे यांच्या सारख्यांनी  केलेली आहे.' मला त्यांच्यासारखे विषयांतराला धरून लिहिता येत नाही' किंवा त्यांच्या मधेच कंसात पक्षी म्हणून लिहिण्याला उद्देशून 'माधवरावांच्या लिखाणात पक्षी उडत असतात ' ही दोन पटकन आठवणारी उदाहरणे.पण वडीलधारे आसपास नाहीत याची खात्री करून घेऊन त्यांची नक्कल करणाऱ्या नातवंडांचा प्रेमळ, लाडिक आविर्भाव त्या थट्टेमागे असे. नावानंतर शिवाजी पार्क रोड नं. तीन एवढ्या पत्त्यावरही ज्यांना  नक्की पत्र मिळत असे असे  ते व्यक्तिमत्त्व म्हणजे जुन्या दादरच्या , शिवाजी पार्क परिसराचे एक भूषण होते.
"आपले लेखन अमुक मासिकात आले आहे असे सांगू नये आणि लेखनाचा डिफ़ेन्स ही करु नये.तुम्ही अनुवाद करु नका, स्वतंत्र लिहा "या माधव मनोहर यांच्या सूचना होत्या.त्यांना आपल्या स्वतःबद्द्ल जराही भ्रम नव्हता.आपण निरीक्षणे लिहिता त्याचे फलित काय या माझ्या प्रश्नावर ते लगेच म्हणाले, " काही नाही.जे नाटकच नव्हे असे मी लिहितो त्या नाटकाचे  शेकडो प्रयोग होतात आणि मी जे चांगले नाटक म्हणतो ते चालत नाही".हे अगदी सहजतेने , निर्विकारपणे pat came the reply म्हणतात तसे दिलेले उत्तर होते." मी लिहायला सुरुवात केली तेव्हा त्यातून पैसे मिळण्याचा प्रश्नच नव्हता .आपले लिखाण छापतात हेच मोठे वाटत असे .आता कोरा चेक देऊन लेखन मागतात ". अश्लील वाटतील अशी पुस्तकेही त्यांच्या बाहेरच्या खोलीत ठेवलेली पाहून मी म्हटले. ' सर, यांना कव्हर वगैरे का घालत नाही?' यावर पुस्तकांची जी छापील कव्हर्स असतात त्यांचे म्हणून एक डिझाईन बनते असे ते म्हणाले .माझ्या प्रश्नाचा रोख स्पष्ट करत मी पुन्हा विचारले . ' तसं नाही.घरातल्याच किंवा बाहेरच्या कोणी हे वाचले तर ?' ते मोठ्याने हसून म्हणाले, ' आधी इंग्लीश म्हटल्यावर बहुतेक जण ते उघडत सुद्धा नाहीत वाचणे राहिले दूरच '. त्यांच्याकडे असलेले  आणि वाचून आवडलेले एखादे पुस्तक मी विकत घेतले आणि त्यांना सांगितले की म्हणत ' अरे, मजजवळ आहे की मग ते कशाला  घेतलेत?'.मला पुस्तक देतांना ' बघा आवडले तर , नाहीतर द्या सोडून' असे सांगत.वाचन आनंदासाठी करायचे हा त्यांचा कटाक्ष होता.आडवाटेवरचा महाराष्ट्र असे एक पुस्तक आहे तसे ते सहसा इतरांच्या नजरेत आली नसतील अशी पुस्तके ते वाचत.चरित्रआत्मचरित्रे वाचण्यावर त्यांचा भर असे.शेक्सपियर मला समजत नाही आणि त्यामुळे आवडतही नाही असे म्हटल्यावर ते म्हणाले ,' मग अजिबात वाचू नका.' मोराव्हियाचे रोमन टेल्स , गार्सन कॅनिनची पुस्तके, अर्ल विल्सन ची हाॅलिवूड विषयीची पुस्तके त्यांच्यामुळे मी वाचली.

बुधवार, १६ जून, २०२१

रंग माझा वेगळा

                                              रंग माझा वेगळा

आपल्या शिकवण्यात वेगळेपणा ,काहीतरी खास स्वतःचे म्हणून वैशिट्य निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येक 
शिक्षक करत असतो अशी माझी कल्पना आहे . मी तो कसा केला त्याबाबत हे विवेचन .
मी संस्कृत शिकवत असलो तरी त्यावेळी नेमलेली मराठी , हिंदी आणि इंग्लिश पाठ्यपुस्तके मी पाहत असे ,त्यात काही साम्य आढळते का शोधून त्याचा उल्लेख मी शिकवताना करत असे .मुलांना त्याची गंमत वाटे आणि इतर कोणी शिक्षक हे करत नसल्याने त्यांना ते आवडत असे . त्यावेळी लोकप्रिय असलेल्या मराठी ,हिंदी गाण्यांचा मी एखादा मुद्दा स्पष्ट करताना उपयोग करत असे .संस्कृत श्लोक शिकवताना त्या श्लोकांच्या अन्वयार्थापलीकडे स्वतःचा विचार कसा करायचा ते मी जाणीवपूर्वक कसा करत असे ते खालील नमुन्यांवरून कळेल .
साधा आठव्या इयत्तेच्या पुस्तकातला ' परोपकाराय फलन्ति वृक्षाः ... ' हा श्लोक सर्वाना माहित आहे .पाच मिनिटात शिकवून संपतो . मी ही तसाच तो संपवत असे पण पुढच्या श्लोकाला सुरुवात करण्याच्या आधी मी '
" वृक्ष स्वतःची फळे खाऊ शकतील का ? परोपकारासाठी त्यांना फळे येतात ही कविकल्पना आहे . पाणी सखल भागाकडे वाहत जाते ते त्याच्या नियमाने .नद्या परोपकारासाठी वाहत नाहीत . माणसाने त्या फळांचा , पाण्याचा उपयोग करून घेतला एवढेच खरे . " हे सांगताना सावरकरांच्या ' विश्वाचा देव आणि माणसाचा देव ' या प्रसिद्ध निबंधाचा परिचय मुलांना करून देत असे .विंदा करंदीकर यांच्या एका लघुनिबंधात " कोंबडी ,बोकड हे आपल्याला मटण मिळावे म्हणून निर्माण झाले असा विचार करणे ही माणसाच्या आत्मकेंद्रित विचारसरणीची परिसीमा आहे 'असे म्हटले आहे . काही अंशी याचे वेगळे रूप पु.ल. देशपांडे यांच्या काकाजींच्या तोंडी घातलेल्या  संवादात आहे . "आषाढात मेघांचा पखवाज वाजतो तो तुझ्यासाठी .. "इ. त्या श्लोकाचे निमित्त करून मुलांना उत्तमोत्तम साहित्याची ओळख मी करून देत असे . आपल्या वाचनाचे प्रदर्शन करून विद्यार्थ्यांवर छाप पाडण्याचा  नव्या शिक्षकाचा हा प्रयत्न होता असेही म्हणता येईल तो नाकारण्यासारखाही  नाही .
 ' असारे खलु संसारे सारं श्वशुरमंदिरम् ' हा असाच श्लोक आहे . त्यावरून मी जावयाला म्हणजे पुरुषाला सासुरवाडीला मान मिळतो वगैरे सांगून एखाद्या लग्न झालेल्या मुलीला सासूसासऱ्याचे हे सारम् वाटेल का अशी सुरुवात करून पुरुषी दृष्टीकोन या श्लोकात आहे , पुरुषांनी पुरुषांसाठी लिहिलेले असे समजून वाचा असे सांगत असे .( ' कन्यादान ' या शब्दात कन्या ही मालकीची वस्तू आहे ही कल्पना कळत नकळत दिसते तसेच हे नाही का? } अशा विवेचनाने  फेमिनिझमशी मुलांची ओळख करून देत असे . नि:स्पृहस्य तृणं जगत शिकवताना छबिलदास शाळेतले एक सर " जगाला पण निस्पृह माणसाची  किमत नसते " असे सांगत असे मी ऐकले होते . नि:स्पृह असणे चांगले पण त्याचा अहंकार आपल्याला काटेरी तर बनवत नाही ना असा प्रश्न विचारायला प्रवृत्त करणारा तो  विचार वाटला मला .
संस्कृत जुने ,जुनाट आणि अप्रस्तुत वाटू नये अशा विचाराने मी संस्कृत शिकवले . अक्रोधेन जयेत् क्रोधं हे सहज पटण्यासारखे नाही ,विनोबा भावे यांचा एक प्रसिद्ध निबंध आहे 'जशास तसे ' मधुकर' नावाच्या संग्रहातला हा निबंध युक्तिवाद आणि नर्म विनोद या दृष्टीने मुळातून वाचण्यासारखा  आहे . त्यात ते म्हणतात तलवारीशी तलवारीने लढावे असा या म्हणीचा अर्थ आपण लावतो कारण तलवार हातातून गेली आहे .आपल्याला लढाईचा प्रत्यक्ष अनुभव नाही .खरोखर लढणाऱ्या माणसाला विचारले तर तो म्हणेल , ' तलवारीशी ढालीने लढतात ' तसेच रागाला प्रेमाने जिंकावे .मी रीडर्स डायजेस्ट मध्ये वाचलेल्या एका  लेखाचे शीर्षक Love thy enemies and drive them crazy  मी मुलांना सांगत असे ,कधीकधी समोरच्या रागावलेल्या माणसाला आपण शांत राहून ,आपण पण चिडू या त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळा प्रतिसाद देऊन जिंकता येते ., गडकऱ्याना एक माणूस चिडून म्हणाला '" मी गाढवाशी बोलत नाही ". त्यावर ते म्हणाले , "पण मी मघाचपासून  बोलतोय. "कधीकधी  विनोदानेही क्रोधाचा सामना करता येतो . अशी उदाहरणे देऊन शिकवणे रंजक करता येते .
आमचे एक रसायनशास्त्र शिकवणारे सर संप्लवन ( sublimation)शिकवत होते .त्यांनी एखादा हुशार मुलगा पाचवीतून एकदम सातवीत जातो तसेच काही पदार्थ घनरूपातून द्रवरुपाची अवस्था  ओलांडून एकदम वायुरूपात जातात त्या स्थित्यंतराला संप्लवन म्हणतात असे व्यवहारातले आम्हाला पटेल ,परिचयाचे वाटेल असे उदाहरण देऊन शिकवले होते .दुसऱ्या एका शिक्षकांनी मराठी आणि इंग्लिश वाक्यरचनेतला फरक कसा समजावून सांगितला ठाऊक आहे ? ते म्हणाले ' " आपल्याकडे घरातले सगळे बाहेर जायला निघाले की बाबा पहिल्याने . मग मुले बाहेर पडतात .आई बिचारी नळ बंद केले का , लाइट्स पंखे बंद केले न हे सर्व पाहून कुलूप लावून शेवटी येते , मराठी वाक्यात तसेच कर्ता प्रथम ,मग कर्म -विशेषणे इ. आणि शेवटी क्रियापद येते . इंग्लिश मध्ये मिस्टर आणि मिसेस जोडीने बाहेर पडतात .त्यांचे वाक्य तसेच असते . कर्त्यानंतर लगेच क्रियापद ". याचेच अनुकरण मी प्रयोग शिकवताना केले .वाक्य म्हणजे एक कुटुंब असते . काही कुटुंबात वडिलांची सत्ता चालते .पितृसत्ताक आणि पेट्रीआर्कलया शब्दांची ओळख करून देत असे ,काही वाक्यात कर्ता महत्त्वाचा त्याच्याप्रमाणे क्रियापद बदलते तो कर्तरी प्रयोग ,संस्कृतमध्ये कर्तरि हे कर्तृ शब्दाचे सप्तमीचे रूप आहे म्हणजे सत्ता कर्त्यात राहते . मग पहिल्याने दोनच शब्दाचे वाक्य घ्यायचे   राम: खादति मग द्विचन केले  तर / राम: लक्ष्मण: च खादत: होईल .बहुवचन केले तर राम: लक्ष्मण: सीता च खादन्ति  असे होईल . कर्त्याच्या वचनाप्रमाणे क्रियापद बदलते हा मुद्दा .सर्वच सांगायची गरज नाही .जे शिकवायचे त्याचा  माणसाच्या जीवनाशी प्रत्यक्ष साक्षात संबंध  फक्त विज्ञान शिकवतानाच जोडता येतो असे नाही तर सर्वच विषय आपल्या जीवनाशी जोडलेले आहेत हे.शिकवणे  जरा वेगळे आहे असे मुलांना वाटले पाहिजे . काही कल्पना मला शिकताना समजल्या नव्हत्या त्या मुलानाही समजलेल्या नसतील म्हणून मी मुद्दाम त्या अधिक जोर देऊन शिकवत असे , भावे प्रयोगाला भावे का म्हणतात ? भाव म्हणजे क्रियापदाचा अर्थ . वाक्याची अशी रचना की जिथे क्रियाच महत्त्वाची ,इतकी की कर्त्याच्या पुरुष ,वचनाचे काही महत्त्व उरलेले नसते . मया स्थीयते .  आवाभ्यां स्थीयते आणि अस्माभिःः स्थीयते . उभे राहण्याची /थांबण्याची क्रिया घडते एवढेच कित्येक शिक्षकांना भावे माहित नव्हते आणि त्यांना कोणी  विद्यार्थ्याने विचारले नसल्याने ते माहित नाही हेही माहित नव्हते .
समास आणि संधी यातला नेमका फरक हा असाच एक विषय कोणाला हा फरक नेमका काय असा प्रश्न पडला नाही .संधीमध्ये पहिल्या शब्दाचे शेवटचे अक्षर आणि पुढच्या शब्दाचे पहिले अक्षर यांचे ध्वनी जोडले जातात . एकमेकात मिसळतात , समासात दोन पदांच्या अर्थांचा संयोग होतो . सूर्यस्य + उदय  = सूर्यस्योदय हा संधी. पण तीच दोन पदे समासात एकत्र येताना पहिल्या पदाचा विभक्ति प्रत्यय गळतो आणि मग संधी होऊन सूर्योदय हा सामासिक शब्द तयार होतो , सूर्य एक तेजोगोल आणि तो वर येणे म्हणजे उदय या दोन अर्थाचा  संयोग होतो ,समासाचे प्रकार शिकवताना पहिले पद प्रधान ,जास्त महत्त्वाचे असे ऐकताना ते प्रधान कसे हाही एक कोणी विचारत नसलेला प्रश्न आहे . व्याकरणामध्ये कोणाला, कितपत  रस असतो हा अडचणीत टाकणारा प्रश्न आहे .
  संस्कृतमध्ये समासांची  नावे लक्ष देण्यासारखी आहेत . अव्ययीभाव शिकवताना मी मराठीतले तशाच प्रकारचे  शब्द प्रथम सांगत असे . भाव किंवा भवन म्हणजे होण्याची क्रिया . बाष्पीभवन ,स्फटिकीभवन हे  विज्ञानातले शब्द त्यांच्या इंग्लिश प्रतिशब्दांसह सांगितले की आपले संस्कृत शिक्षक अगदीच काही  'हे'
 ( बावळट) नाहीत अशी मुलांची खात्री पटते .अव्ययीभाव म्हणजे जो शब्द मुळात अव्यय / अविकारी नाही तो अव्ययाबरोबर  जोडल्यामुळे अव्यय बनतो .जोपर्यंत जोडलेला आहे तोपर्यंत त्याला विभक्तिप्रत्यय लागून त्याची रूपे होत नाहीत . हे प्रवर्तित चुंबकत्वासारखे ( temporary magnetism) सारखे आहे . दिन शब्द घ्या .सुटा, एकटा आहे तोपर्यंत तो नाम आहे त्याची दिनम् दिने दिनानि ..अशी आठ विभक्तींची चोव्वीस रूपे होतात . पण तो प्रति या अव्ययाशी जोडला आणि प्रतिदिनम् असा समास झाला की तो अव्ययचं होतो .संगतीचा हा परिणाम !  माणसाने निर्माण केलेल्या भाषेतले शब्द देखील माणसासारखे आहेत  हा माझा आवडता विचार पुन्हा एकदा सांगायची संधी कधी कधी वर्गाचा मूड पाहून मी घेत असे . पाठ्यपुस्तकात आलेले प्रति हे पहिले पद असलेले शब्द पाहून त्यांची यादी करणे ,त्यातही सोप्याकडून कठिणाकडे अशी रचना करून ते छान फलकलेखन करून शिकवायचे . दिने दिने प्रतिदिनम्. . मग दिवसे दिवसे  याचा समास काय ? असा प्रश्न आणि उत्तर प्रतिदिवसम् आल्यावर उत्तर देणाऱ्याचे कौतुक करत  असे .  प्रत्यहम् हा जरा त्यांना विचार करायला लावणारा शब्द फळ्यावर लिहायचा . दिन ,दिवस यांच्यापेक्षा वेगळा  पण त्याच अर्थाचा अहन् हा व्यंजनान्त शब्द आहे . मराठीतले अहोरात्र ,अहर्निश मध्याह्न वगैरे शब्द यापासूनच बनलेले आहेत .असे सांगत त्याचा विग्रह अहनि  अहनि सांगायचा ,फळ्यावर लिहायचा , म्हणून घ्यायचा . परत मागे जाऊन सगळे पुन्हा म्हणून घ्यायचे . मी निरीक्षण करून पहिले आहे की चांगल्या शिकवण्यात थोडेसे पाल्हाळ ,कंटाळा न येऊ देताकेलेली पुनरुक्ती आणि शिकवणाऱ्या शिक्षकाचा खास त्याचा असा वेगळेपणा हे घटक असतातच .