त्यांच्या लिखाणात ऐसपैस , रंजक पाल्हाळ असे आणि त्यांच्या विशिष्ट लकबींचि माफक थट्टाही अनंता भावे यांच्या सारख्यांनी केलेली आहे.' मला त्यांच्यासारखे विषयांतराला धरून लिहिता येत नाही' किंवा त्यांच्या मधेच कंसात पक्षी म्हणून लिहिण्याला उद्देशून 'माधवरावांच्या लिखाणात पक्षी उडत असतात ' ही दोन पटकन आठवणारी उदाहरणे.पण वडीलधारे आसपास नाहीत याची खात्री करून घेऊन त्यांची नक्कल करणाऱ्या नातवंडांचा प्रेमळ, लाडिक आविर्भाव त्या थट्टेमागे असे. नावानंतर शिवाजी पार्क रोड नं. तीन एवढ्या पत्त्यावरही ज्यांना नक्की पत्र मिळत असे असे ते व्यक्तिमत्त्व म्हणजे जुन्या दादरच्या , शिवाजी पार्क परिसराचे एक भूषण होते.
"आपले लेखन अमुक मासिकात आले आहे असे सांगू नये आणि लेखनाचा डिफ़ेन्स ही करु नये.तुम्ही अनुवाद करु नका, स्वतंत्र लिहा "या माधव मनोहर यांच्या सूचना होत्या.त्यांना आपल्या स्वतःबद्द्ल जराही भ्रम नव्हता.आपण निरीक्षणे लिहिता त्याचे फलित काय या माझ्या प्रश्नावर ते लगेच म्हणाले, " काही नाही.जे नाटकच नव्हे असे मी लिहितो त्या नाटकाचे शेकडो प्रयोग होतात आणि मी जे चांगले नाटक म्हणतो ते चालत नाही".हे अगदी सहजतेने , निर्विकारपणे pat came the reply म्हणतात तसे दिलेले उत्तर होते." मी लिहायला सुरुवात केली तेव्हा त्यातून पैसे मिळण्याचा प्रश्नच नव्हता .आपले लिखाण छापतात हेच मोठे वाटत असे .आता कोरा चेक देऊन लेखन मागतात ". अश्लील वाटतील अशी पुस्तकेही त्यांच्या बाहेरच्या खोलीत ठेवलेली पाहून मी म्हटले. ' सर, यांना कव्हर वगैरे का घालत नाही?' यावर पुस्तकांची जी छापील कव्हर्स असतात त्यांचे म्हणून एक डिझाईन बनते असे ते म्हणाले .माझ्या प्रश्नाचा रोख स्पष्ट करत मी पुन्हा विचारले . ' तसं नाही.घरातल्याच किंवा बाहेरच्या कोणी हे वाचले तर ?' ते मोठ्याने हसून म्हणाले, ' आधी इंग्लीश म्हटल्यावर बहुतेक जण ते उघडत सुद्धा नाहीत वाचणे राहिले दूरच '. त्यांच्याकडे असलेले आणि वाचून आवडलेले एखादे पुस्तक मी विकत घेतले आणि त्यांना सांगितले की म्हणत ' अरे, मजजवळ आहे की मग ते कशाला घेतलेत?'.मला पुस्तक देतांना ' बघा आवडले तर , नाहीतर द्या सोडून' असे सांगत.वाचन आनंदासाठी करायचे हा त्यांचा कटाक्ष होता.आडवाटेवरचा महाराष्ट्र असे एक पुस्तक आहे तसे ते सहसा इतरांच्या नजरेत आली नसतील अशी पुस्तके ते वाचत.चरित्रआत्मचरित्रे वाचण्यावर त्यांचा भर असे.शेक्सपियर मला समजत नाही आणि त्यामुळे आवडतही नाही असे म्हटल्यावर ते म्हणाले ,' मग अजिबात वाचू नका.' मोराव्हियाचे रोमन टेल्स , गार्सन कॅनिनची पुस्तके, अर्ल विल्सन ची हाॅलिवूड विषयीची पुस्तके त्यांच्यामुळे मी वाचली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा