सोमवार, २० एप्रिल, २०२६

 

राहून गेलेली गोष्ट 
माध्यमिक शाळेत संस्कृत, मराठी आणि इंग्लिश हे विषय वरच्या वर्गातील मुलांना जवळपास तीस बत्तीस वर्षे शिकवून सेवानिवृत्त होऊन देखील आता वीस वर्षे होऊन गेली.शाळा का़ॅलेजमध्ये संस्कृत  शिकलो त्याखेरीज दादरला हर्डीकर शास्त्री म्हणून पौरोहित्य करणारे विद्वान गृहस्थ होते.माझे वडील देखील भटजींचे काम करत असल्याने त्यांच्याशी परिचय होता.त्या हर्डीकर शास्त्री यांच्याकडे मी रघुवंशाचा दुसरा सर्ग शिकलो( जुन्या भाषेत म्हटला ).ते श्लोक शिकताना अनुषंगाने काही पाणिनीच्या सूत्रांची ओझरती ओळख झाली.' पञ्चम्यास्तसिल् ' पंचमी विभक्तीच्या अर्थाने नात्यांना तस्( त:) प्रत्यय लागून अव्यये बनतात हे कळल्यावर अत: ,तत:, इत: हे शब्द कळले. ' विद्यात: बुद्धिरुत्तमा ' हे पाठाचे शीर्षक सहजच समजले.एक ना दोन अशा पुष्कळ गोष्टी आठवतात .
त्यांच्याकडे शिकलेले संस्कृत प्रमुख विषय घेऊन बी.ए.पास होईपर्यंत उपयोगी पडले. 
संस्कृत भाषेची गंमत अशी आहे की जवळपास सगळ्याच मराठी माणसांना आपल्याला ती चांगली अवगत झाली आहे असे वाटते पण भाजीवाल्याबरोबर हिंदी बोलता आले म्हणजे हिंदी भाषा चांगली येते असे म्हणण्यासारखंच हे वेडगळपणाचे आहे.मला सुदैवाने वेगवेगळ्या निमित्ताने आपले संस्कृतचे ज्ञान अगदी तुटपुंजे आहे हे कळले.अगदी कालचीच गोष्ट .अक्षय आणि अक्षय्य यांच्यात अर्थाच्या दृष्टीने काय फरक‌ आहे हे मला समजले नव्हते. उलट पाणिनी शिकलेल्या एका सुहृदांनी पटकन सूत्र उद्धृत करून उलगडा केला.अक्षय्य म्हणजे ज्याचा नाश होणे शक्य नाही. पाणिनीच्या अष्टाध्यायीचे अध्ययन केले नाही, त्यामुळे आपले संस्कृतचे ज्ञान वरवरचे , भ्रामक,पल्लवग्राही राहिले हे नव्याने जाणवले. खरं म्हणजे शास्त्रीबुवांना सांगितले असते तर त्यांनी आनंदाने, मनापासून आणि विनामूल्य शिकवले असते परंतु ते त्यावेळी सुचले नाही.पण आपल्याकडे पुनर्जन्माची कल्पना फार छान आहे त्यामुळे मी पुढच्या जन्मात कधीतरी पाणिनीची अष्टाध्यायी, पतंजलीचे महाभाष्य इत्यादी शिकेन हे स्वप्न आता शेवटपर्यंत पैलतीरावरून खुणावत राहणार हे निश्चित !

गजानन गुर्जरपाध्ये 


शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४

रुपारेल काॅलेज

 सुरु रूपारेल काॅलेजचे प्राचार्य असतांना नोकरी करणार्‍या मुलांसाठी सकाळचे वर्ग सुरु झाले होते.संस्कृतचे सुरु यांचे लेक्चर ते संध्याकाळी घेत .त्यांच्या काळात आचार्य अत्रे ,स.गो.बर्वे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.सुरु यांनीअत्रे यांचा परिचय करून देतांना रघुवंशातल्या ' आकारसदृशप्रज्ञः ..' आणि त्यावर आपल्या खास शैलीत अत्रे यांनी सुरुवातीलाच, मी काॅलेजात असतांना व्यायाम करण्याचा निश्चय करून व्यायामशाळेत गेलो.तिथे सुरु व्यायाम करत होते त्यांचे पिळदार शरीर पाहून मी मागेच फिरलो . फरक एवढाच आहे की आता माझा आकार प्रचंड झाला आहे आणि सुरु यांचा....'बर्वे अर्थमंत्री होते त्यावेळी त्यांची ओळख '  Hon.Barve is also a Poonaite like me ' असा अनौपचारिक प्रारंभ करून त्यांच्या पानशेत धरण फुटले त्यावेळच्या कामगिरीचा उल्लेख केला होता.बर्वे यांनी प्रथमच, मी सुरु सरांचा विद्यार्थी आहे,त्यांची व्याख्याने अजून आठवतात असे सांगितले.

संध्याकाळच्या वर्गासाठी सुरु सरांना काॅलेजच्या आवारात असलेल्या  त्यांच्या बंगल्यातून मी हात धरून आणत असे.

सोमवार, ६ जून, २०२२

द मॅजिशियन

कॉम टोईबिन या आयरिश लेखकाची थोमास मान याच्या चरित्र व वाङ्मयाचा वेध घेणारी ' द मॅजिशियन' ही कादंबरी नुकतीच वाचली .मी  नोबेल पारितोषिक विजेत्या थोमास मान या जर्मन लेखकाने लिहिलेले काहीही वाचलेले नाही तरीही ही कादंबरी मला अतिशय आवडली हे विशेष.मला ते ललित चरित्र आहे असे म्हणावेसे वाटते. एका बहुप्रसू लेखकाने कल्पनेच्या, अभ्यासाच्या आणि उपलब्ध सर्व साहित्याच्या साहाय्याने दुसऱ्या लेखकाच्या  अंतरंगात शिरून ते वाचकांना जणू उलगडून दाखवले आहे असा अनुभव देणारे हे पुस्तक सर्वांनी  अवश्य वाचावे .
मान जर्मनीमध्ये जन्मला .वडील श्रीमंत व्यापारी आणि सिनेटर .आई कलासक्त , ब्राझिलमध्ये जन्मलेली आणि तेथील वातावरण न विसरु शकलेली , मनाने अजून ब्राझीलमध्येच जगणारी त्यामुळे नवऱ्याच्या नातेवाईकांना परकी, नकोशी वाटणारी .वडिलांच्या मृत्यूनंतर श्रीमंती ओसरली.थोमास आणि त्याचा भाऊ दोघांनाही लेखक होण्याची इच्छा होती.थोमासला आईचा म्हणावा तसा पाठिंबा मिळाला नाही पण त्याला सुरुवातीपासून प्रसिद्धी, यश मिळाले.त्यातूनच त्याचे लग्न जुळले.ज्यू  पण जवळ जवळ निधर्मी अशा कुटुंबात जन्मलेली त्याची बायको आणि तिचा जुळा भाऊ क्लॉज यांच्यात खूप , जगावेगळी वाटेल अशी जवळीक असते.लग्नानंतर मानची पहिली प्रसिद्ध झालेली आणि गाजलेली कथा जुळ्या बहिण भावांच्या अशाच जोडीवर होती.  हिटलरच्या   उदयानंतर आणि नोबेल पारितोषिक मिळाल्या नंतर मानला जर्मनी सोडावा लागला , त्याला रुझवेल्ट अध्यक्ष असतांना अमेरीकेत प्रथम आश्रय आणि नंतर नागरिकत्व  मिळाले त्याची कथा विलक्षण गुंतागुंत असलेली आणि रंजक आहे.दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला अमेरिकन जनतेचा त्यात पडण्यास विरोध होता.नंतर ते चित्र बदलले .हा बदल होत असतांना मानला अमेरिकन जनतेच्या मूडशी जुळवून घेण्यात 'वॉशिंग्टन पोस्ट' चे मालक युजिन मेअर आणि त्यांच्या पेक्षाही त्यांच्या बायकोची मदत आणि मार्गदर्शन कसे झाले ते वाचलेच पाहिजे असे आहे. महायुद्ध संपल्यावर  पूर्व जर्मनीला मानने भेट देऊ नये म्हणून अमेरिकन सरकारच्या दबावाला न जुमानल्यामुळे अमेरिकेला त्याच्याविषयी वाटणारे प्रेम आटले.शेवटी त्याने स्विट्झरलंडला स्थाईक होण्याचे ठरवले इथे पुस्तक संपते.
दोन भावांमधील वैचारिक मतभेद, लेखक म्हणून स्पर्धा ,युरोपातले राजकारण, यशस्वी बापाची तितकीशी यशस्वी नसलेली आणि काहीशी बेजबाबदार मुले , सुखी समाधानी वैवाहिक आयुष्य वाट्याला येऊनही मानला असणारे समलैंगिक संबंधांचे आकर्षण या सर्व गोष्टी आणि त्याच्या महत्त्वाच्या पुस्तकांची निर्मितीप्रक्रिया या सर्व गोष्टी योग्य प्रमाणात एकजीव  झाल्यामुळे रसमयी बनलेली ही कथा प्रत्येकाने चवीने वाचावी अशी झाली आहे.

रविवार, ५ जून, २०२२

अहा ते सुंदर दिन हरपले -- शांता शेळके

अहा ते सुन्दर दिन हरपले

अहा ते सुन्दर दिन हरपले
मधुभावाचे वेड जयांनी जीवाला लाविले
दृष्टी होती मुग्ध निरागस
अन्तर होते प्रेमळ लालस
चराचरांतुन सौन्दर्याचे किरण तदा फांकले
शशिला होती अपूर्व सुषमा
आणि नभाला गहन नीलिमा
सुखोष्ण गमले प्रभातरविचे कर तेव्हां कोवळे !
तृणपर्णातुन, रानफुलांतुन
जललहरींतुन वा ताऱ्यांतुन
स्नेहलतेचे अद्भुत लेणे सहज तदा लाभले
मृदुल उमलल्या कलिका चुंबित
पुष्पदलांना उरि कवटाळित-
संध्येचे मधुरंग बदलते हर्षभरें निरखिले!
अवनी गमली
अद्भुतअभिनव
जिथें सुखाविण दुजा न संभव
घरि वा दारी वात्सल्याचे मळे नित्य बहरले
आतां नुरलें तें संमोहन
विषष्ण गमतें अवघे जीवन
बाल्य संपतां आज जगाचे रूप सर्व बदललें!
अहा ते सुंदर दिन हरपले

शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

इंग्लीश

अकरावीच्या शेवटी बोर्डाच्या परीक्षेला माझा नंबर एका कॉन्व्हेंट शाळेत आला.भव्य इमारत आणि त्याहूनही इंग्लीश बोलावे लागणार याची भीती परीक्षेच्या काळजीपेक्षा जास्त भेडसावत होती.आई किंवा वडील मुलाला परीक्षाकेंद्रावर सोडायला येण्याची पद्धत सुरु झाली नव्हती.माझ्या मोठ्या भावाच्या शब्दात, ' रानात झाडे आपोआप वाढतात तशी मुले आपोआप वाढतात 'असा बहुतेक पालकांचा समज होता.आठवीत एबिसिडी शिकायला सुरुवात केलेले, चाळीच्या इमारतीत भरणाऱ्या शाळेत जाणारे आणि कनिष्ठ मध्यमवर्गात मोडणारे आम्ही कशा भांबावलेल्या मन:स्थितीत होतो याची कल्पनाच करावी लागेल.
आपल्या बाकावर डकवलेला क्रमांक आणि हॉल तिकिटावर असलेला क्रमांक एकच असल्याची तिनतिन वेळा खात्री करून घेतली होती.बेल झाली आणि जीवघेण्या शांततेत स्कर्टब्लाऊज घातलेल्याआणि बॉबकट केलेल्या  सुपरवायजर आल्या. हॉलतिकिट पाहण्याचा कार्यक्रम न बोलताच पार पडला.पुरवणी मागण्यासाठी सुद्धा बोलायचा प्रसंग आला नाही.नुसते उभे राहिले की मॅडम अगोदरच सही करून ठेवलेली पुरवणी देत होत्या.इंग्रजी बोलण्याचे मरण अजून ओढवले नव्हते.माझा पेपर वेळेपूर्वी झाला .मी उभा राहिलो.मॅडणी बाकाजवळ आल्या. मी त्यांना मोठ्या प्रयत्नाने जुळवलेल्या इंग्रजीत म्हटले," I want a rope". त्यांनी टेबलावर ठेवलेला दोरा आणला आणि शुद्ध मराठीत हळू आवाजात म्हणाल्या " याला थ्रेड किंवा स्ट्रिंग म्हणतात."त्यांच्या पेहरावामुळे, त्याहीपेक्षा बॉबकटमुळे त्यांच्याशी इंग्लीशशिवाय कोणत्याही भाषेत बोलणे( अलिकडच्या शब्दात,  संवाद साधणे) शक्य नाही असे मला वाटले होते .

रविवार, १७ एप्रिल, २०२२

प्रार्थना रघुनाथाची

भगवन्नाम्नि रुचिर्नास्ति चित्तं विषयलोलुपम्

तथापि परमार्थेच्छा सिद्धिं नयतु त्वत्कृपा

ईषणात्रयमुक्तं मे मानसं स्यात् कदा गुरो

कदा नामामृतस्वादलोलुपा रसना भवेत्

भुञ्जानस्य तु प्रारब्धं न धैर्यं मम नश्यतु

स्मरणं दिव्यनाम्नस्ते प्रसादयतु मानसम्

शुचीनां श्रीमतां गेहे अन्यस्मिन् जन्मनि प्रभो

तव सेवारतं सफलं आयुर्मे देहि निश्चितम्

श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं च सद्गुरुं रघुनाथ त्वाम्

नमामि मनसा भक्त्या भवबन्धनिवारकम्

गुरुवार, १४ एप्रिल, २०२२

अंगुष्ठमात्र चरित्र

पुढारलेल्या देशात ,निर्दोष आणि परिपूर्ण व्यवस्थेत आणि चांगल्या कुटुंबात मी जन्मलो/ ले असतो/ते तर मी काय केले असते त्याची कल्पना सुद्धा तुम्हाला करता येणार नाही !आता मात्र मी या सबबींचे च्युइंगम चघळत कालक्षेप करत आहे !
--- अनेकां/ कींच्या आत्मकथनांचा अंगुष्ठमात्र सारांश .