बुधवार, १६ जून, २०२१

रंग माझा वेगळा

                                              रंग माझा वेगळा

आपल्या शिकवण्यात वेगळेपणा ,काहीतरी खास स्वतःचे म्हणून वैशिट्य निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येक 
शिक्षक करत असतो अशी माझी कल्पना आहे . मी तो कसा केला त्याबाबत हे विवेचन .
मी संस्कृत शिकवत असलो तरी त्यावेळी नेमलेली मराठी , हिंदी आणि इंग्लिश पाठ्यपुस्तके मी पाहत असे ,त्यात काही साम्य आढळते का शोधून त्याचा उल्लेख मी शिकवताना करत असे .मुलांना त्याची गंमत वाटे आणि इतर कोणी शिक्षक हे करत नसल्याने त्यांना ते आवडत असे . त्यावेळी लोकप्रिय असलेल्या मराठी ,हिंदी गाण्यांचा मी एखादा मुद्दा स्पष्ट करताना उपयोग करत असे .संस्कृत श्लोक शिकवताना त्या श्लोकांच्या अन्वयार्थापलीकडे स्वतःचा विचार कसा करायचा ते मी जाणीवपूर्वक कसा करत असे ते खालील नमुन्यांवरून कळेल .
साधा आठव्या इयत्तेच्या पुस्तकातला ' परोपकाराय फलन्ति वृक्षाः ... ' हा श्लोक सर्वाना माहित आहे .पाच मिनिटात शिकवून संपतो . मी ही तसाच तो संपवत असे पण पुढच्या श्लोकाला सुरुवात करण्याच्या आधी मी '
" वृक्ष स्वतःची फळे खाऊ शकतील का ? परोपकारासाठी त्यांना फळे येतात ही कविकल्पना आहे . पाणी सखल भागाकडे वाहत जाते ते त्याच्या नियमाने .नद्या परोपकारासाठी वाहत नाहीत . माणसाने त्या फळांचा , पाण्याचा उपयोग करून घेतला एवढेच खरे . " हे सांगताना सावरकरांच्या ' विश्वाचा देव आणि माणसाचा देव ' या प्रसिद्ध निबंधाचा परिचय मुलांना करून देत असे .विंदा करंदीकर यांच्या एका लघुनिबंधात " कोंबडी ,बोकड हे आपल्याला मटण मिळावे म्हणून निर्माण झाले असा विचार करणे ही माणसाच्या आत्मकेंद्रित विचारसरणीची परिसीमा आहे 'असे म्हटले आहे . काही अंशी याचे वेगळे रूप पु.ल. देशपांडे यांच्या काकाजींच्या तोंडी घातलेल्या  संवादात आहे . "आषाढात मेघांचा पखवाज वाजतो तो तुझ्यासाठी .. "इ. त्या श्लोकाचे निमित्त करून मुलांना उत्तमोत्तम साहित्याची ओळख मी करून देत असे . आपल्या वाचनाचे प्रदर्शन करून विद्यार्थ्यांवर छाप पाडण्याचा  नव्या शिक्षकाचा हा प्रयत्न होता असेही म्हणता येईल तो नाकारण्यासारखाही  नाही .
 ' असारे खलु संसारे सारं श्वशुरमंदिरम् ' हा असाच श्लोक आहे . त्यावरून मी जावयाला म्हणजे पुरुषाला सासुरवाडीला मान मिळतो वगैरे सांगून एखाद्या लग्न झालेल्या मुलीला सासूसासऱ्याचे हे सारम् वाटेल का अशी सुरुवात करून पुरुषी दृष्टीकोन या श्लोकात आहे , पुरुषांनी पुरुषांसाठी लिहिलेले असे समजून वाचा असे सांगत असे .( ' कन्यादान ' या शब्दात कन्या ही मालकीची वस्तू आहे ही कल्पना कळत नकळत दिसते तसेच हे नाही का? } अशा विवेचनाने  फेमिनिझमशी मुलांची ओळख करून देत असे . नि:स्पृहस्य तृणं जगत शिकवताना छबिलदास शाळेतले एक सर " जगाला पण निस्पृह माणसाची  किमत नसते " असे सांगत असे मी ऐकले होते . नि:स्पृह असणे चांगले पण त्याचा अहंकार आपल्याला काटेरी तर बनवत नाही ना असा प्रश्न विचारायला प्रवृत्त करणारा तो  विचार वाटला मला .
संस्कृत जुने ,जुनाट आणि अप्रस्तुत वाटू नये अशा विचाराने मी संस्कृत शिकवले . अक्रोधेन जयेत् क्रोधं हे सहज पटण्यासारखे नाही ,विनोबा भावे यांचा एक प्रसिद्ध निबंध आहे 'जशास तसे ' मधुकर' नावाच्या संग्रहातला हा निबंध युक्तिवाद आणि नर्म विनोद या दृष्टीने मुळातून वाचण्यासारखा  आहे . त्यात ते म्हणतात तलवारीशी तलवारीने लढावे असा या म्हणीचा अर्थ आपण लावतो कारण तलवार हातातून गेली आहे .आपल्याला लढाईचा प्रत्यक्ष अनुभव नाही .खरोखर लढणाऱ्या माणसाला विचारले तर तो म्हणेल , ' तलवारीशी ढालीने लढतात ' तसेच रागाला प्रेमाने जिंकावे .मी रीडर्स डायजेस्ट मध्ये वाचलेल्या एका  लेखाचे शीर्षक Love thy enemies and drive them crazy  मी मुलांना सांगत असे ,कधीकधी समोरच्या रागावलेल्या माणसाला आपण शांत राहून ,आपण पण चिडू या त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळा प्रतिसाद देऊन जिंकता येते ., गडकऱ्याना एक माणूस चिडून म्हणाला '" मी गाढवाशी बोलत नाही ". त्यावर ते म्हणाले , "पण मी मघाचपासून  बोलतोय. "कधीकधी  विनोदानेही क्रोधाचा सामना करता येतो . अशी उदाहरणे देऊन शिकवणे रंजक करता येते .
आमचे एक रसायनशास्त्र शिकवणारे सर संप्लवन ( sublimation)शिकवत होते .त्यांनी एखादा हुशार मुलगा पाचवीतून एकदम सातवीत जातो तसेच काही पदार्थ घनरूपातून द्रवरुपाची अवस्था  ओलांडून एकदम वायुरूपात जातात त्या स्थित्यंतराला संप्लवन म्हणतात असे व्यवहारातले आम्हाला पटेल ,परिचयाचे वाटेल असे उदाहरण देऊन शिकवले होते .दुसऱ्या एका शिक्षकांनी मराठी आणि इंग्लिश वाक्यरचनेतला फरक कसा समजावून सांगितला ठाऊक आहे ? ते म्हणाले ' " आपल्याकडे घरातले सगळे बाहेर जायला निघाले की बाबा पहिल्याने . मग मुले बाहेर पडतात .आई बिचारी नळ बंद केले का , लाइट्स पंखे बंद केले न हे सर्व पाहून कुलूप लावून शेवटी येते , मराठी वाक्यात तसेच कर्ता प्रथम ,मग कर्म -विशेषणे इ. आणि शेवटी क्रियापद येते . इंग्लिश मध्ये मिस्टर आणि मिसेस जोडीने बाहेर पडतात .त्यांचे वाक्य तसेच असते . कर्त्यानंतर लगेच क्रियापद ". याचेच अनुकरण मी प्रयोग शिकवताना केले .वाक्य म्हणजे एक कुटुंब असते . काही कुटुंबात वडिलांची सत्ता चालते .पितृसत्ताक आणि पेट्रीआर्कलया शब्दांची ओळख करून देत असे ,काही वाक्यात कर्ता महत्त्वाचा त्याच्याप्रमाणे क्रियापद बदलते तो कर्तरी प्रयोग ,संस्कृतमध्ये कर्तरि हे कर्तृ शब्दाचे सप्तमीचे रूप आहे म्हणजे सत्ता कर्त्यात राहते . मग पहिल्याने दोनच शब्दाचे वाक्य घ्यायचे   राम: खादति मग द्विचन केले  तर / राम: लक्ष्मण: च खादत: होईल .बहुवचन केले तर राम: लक्ष्मण: सीता च खादन्ति  असे होईल . कर्त्याच्या वचनाप्रमाणे क्रियापद बदलते हा मुद्दा .सर्वच सांगायची गरज नाही .जे शिकवायचे त्याचा  माणसाच्या जीवनाशी प्रत्यक्ष साक्षात संबंध  फक्त विज्ञान शिकवतानाच जोडता येतो असे नाही तर सर्वच विषय आपल्या जीवनाशी जोडलेले आहेत हे.शिकवणे  जरा वेगळे आहे असे मुलांना वाटले पाहिजे . काही कल्पना मला शिकताना समजल्या नव्हत्या त्या मुलानाही समजलेल्या नसतील म्हणून मी मुद्दाम त्या अधिक जोर देऊन शिकवत असे , भावे प्रयोगाला भावे का म्हणतात ? भाव म्हणजे क्रियापदाचा अर्थ . वाक्याची अशी रचना की जिथे क्रियाच महत्त्वाची ,इतकी की कर्त्याच्या पुरुष ,वचनाचे काही महत्त्व उरलेले नसते . मया स्थीयते .  आवाभ्यां स्थीयते आणि अस्माभिःः स्थीयते . उभे राहण्याची /थांबण्याची क्रिया घडते एवढेच कित्येक शिक्षकांना भावे माहित नव्हते आणि त्यांना कोणी  विद्यार्थ्याने विचारले नसल्याने ते माहित नाही हेही माहित नव्हते .
समास आणि संधी यातला नेमका फरक हा असाच एक विषय कोणाला हा फरक नेमका काय असा प्रश्न पडला नाही .संधीमध्ये पहिल्या शब्दाचे शेवटचे अक्षर आणि पुढच्या शब्दाचे पहिले अक्षर यांचे ध्वनी जोडले जातात . एकमेकात मिसळतात , समासात दोन पदांच्या अर्थांचा संयोग होतो . सूर्यस्य + उदय  = सूर्यस्योदय हा संधी. पण तीच दोन पदे समासात एकत्र येताना पहिल्या पदाचा विभक्ति प्रत्यय गळतो आणि मग संधी होऊन सूर्योदय हा सामासिक शब्द तयार होतो , सूर्य एक तेजोगोल आणि तो वर येणे म्हणजे उदय या दोन अर्थाचा  संयोग होतो ,समासाचे प्रकार शिकवताना पहिले पद प्रधान ,जास्त महत्त्वाचे असे ऐकताना ते प्रधान कसे हाही एक कोणी विचारत नसलेला प्रश्न आहे . व्याकरणामध्ये कोणाला, कितपत  रस असतो हा अडचणीत टाकणारा प्रश्न आहे .
  संस्कृतमध्ये समासांची  नावे लक्ष देण्यासारखी आहेत . अव्ययीभाव शिकवताना मी मराठीतले तशाच प्रकारचे  शब्द प्रथम सांगत असे . भाव किंवा भवन म्हणजे होण्याची क्रिया . बाष्पीभवन ,स्फटिकीभवन हे  विज्ञानातले शब्द त्यांच्या इंग्लिश प्रतिशब्दांसह सांगितले की आपले संस्कृत शिक्षक अगदीच काही  'हे'
 ( बावळट) नाहीत अशी मुलांची खात्री पटते .अव्ययीभाव म्हणजे जो शब्द मुळात अव्यय / अविकारी नाही तो अव्ययाबरोबर  जोडल्यामुळे अव्यय बनतो .जोपर्यंत जोडलेला आहे तोपर्यंत त्याला विभक्तिप्रत्यय लागून त्याची रूपे होत नाहीत . हे प्रवर्तित चुंबकत्वासारखे ( temporary magnetism) सारखे आहे . दिन शब्द घ्या .सुटा, एकटा आहे तोपर्यंत तो नाम आहे त्याची दिनम् दिने दिनानि ..अशी आठ विभक्तींची चोव्वीस रूपे होतात . पण तो प्रति या अव्ययाशी जोडला आणि प्रतिदिनम् असा समास झाला की तो अव्ययचं होतो .संगतीचा हा परिणाम !  माणसाने निर्माण केलेल्या भाषेतले शब्द देखील माणसासारखे आहेत  हा माझा आवडता विचार पुन्हा एकदा सांगायची संधी कधी कधी वर्गाचा मूड पाहून मी घेत असे . पाठ्यपुस्तकात आलेले प्रति हे पहिले पद असलेले शब्द पाहून त्यांची यादी करणे ,त्यातही सोप्याकडून कठिणाकडे अशी रचना करून ते छान फलकलेखन करून शिकवायचे . दिने दिने प्रतिदिनम्. . मग दिवसे दिवसे  याचा समास काय ? असा प्रश्न आणि उत्तर प्रतिदिवसम् आल्यावर उत्तर देणाऱ्याचे कौतुक करत  असे .  प्रत्यहम् हा जरा त्यांना विचार करायला लावणारा शब्द फळ्यावर लिहायचा . दिन ,दिवस यांच्यापेक्षा वेगळा  पण त्याच अर्थाचा अहन् हा व्यंजनान्त शब्द आहे . मराठीतले अहोरात्र ,अहर्निश मध्याह्न वगैरे शब्द यापासूनच बनलेले आहेत .असे सांगत त्याचा विग्रह अहनि  अहनि सांगायचा ,फळ्यावर लिहायचा , म्हणून घ्यायचा . परत मागे जाऊन सगळे पुन्हा म्हणून घ्यायचे . मी निरीक्षण करून पहिले आहे की चांगल्या शिकवण्यात थोडेसे पाल्हाळ ,कंटाळा न येऊ देताकेलेली पुनरुक्ती आणि शिकवणाऱ्या शिक्षकाचा खास त्याचा असा वेगळेपणा हे घटक असतातच .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा