राहून गेलेली गोष्ट
माध्यमिक शाळेत संस्कृत, मराठी आणि इंग्लिश हे विषय वरच्या वर्गातील मुलांना जवळपास तीस बत्तीस वर्षे शिकवून सेवानिवृत्त होऊन देखील आता वीस वर्षे होऊन गेली.शाळा का़ॅलेजमध्ये संस्कृत शिकलो त्याखेरीज दादरला हर्डीकर शास्त्री म्हणून पौरोहित्य करणारे विद्वान गृहस्थ होते.माझे वडील देखील भटजींचे काम करत असल्याने त्यांच्याशी परिचय होता.त्या हर्डीकर शास्त्री यांच्याकडे मी रघुवंशाचा दुसरा सर्ग शिकलो( जुन्या भाषेत म्हटला ).ते श्लोक शिकताना अनुषंगाने काही पाणिनीच्या सूत्रांची ओझरती ओळख झाली.' पञ्चम्यास्तसिल् ' पंचमी विभक्तीच्या अर्थाने नात्यांना तस्( त:) प्रत्यय लागून अव्यये बनतात हे कळल्यावर अत: ,तत:, इत: हे शब्द कळले. ' विद्यात: बुद्धिरुत्तमा ' हे पाठाचे शीर्षक सहजच समजले.एक ना दोन अशा पुष्कळ गोष्टी आठवतात .
त्यांच्याकडे शिकलेले संस्कृत प्रमुख विषय घेऊन बी.ए.पास होईपर्यंत उपयोगी पडले.
संस्कृत भाषेची गंमत अशी आहे की जवळपास सगळ्याच मराठी माणसांना आपल्याला ती चांगली अवगत झाली आहे असे वाटते पण भाजीवाल्याबरोबर हिंदी बोलता आले म्हणजे हिंदी भाषा चांगली येते असे म्हणण्यासारखंच हे वेडगळपणाचे आहे.मला सुदैवाने वेगवेगळ्या निमित्ताने आपले संस्कृतचे ज्ञान अगदी तुटपुंजे आहे हे कळले.अगदी कालचीच गोष्ट .अक्षय आणि अक्षय्य यांच्यात अर्थाच्या दृष्टीने काय फरक आहे हे मला समजले नव्हते. उलट पाणिनी शिकलेल्या एका सुहृदांनी पटकन सूत्र उद्धृत करून उलगडा केला.अक्षय्य म्हणजे ज्याचा नाश होणे शक्य नाही. पाणिनीच्या अष्टाध्यायीचे अध्ययन केले नाही, त्यामुळे आपले संस्कृतचे ज्ञान वरवरचे , भ्रामक,पल्लवग्राही राहिले हे नव्याने जाणवले. खरं म्हणजे शास्त्रीबुवांना सांगितले असते तर त्यांनी आनंदाने, मनापासून आणि विनामूल्य शिकवले असते परंतु ते त्यावेळी सुचले नाही.पण आपल्याकडे पुनर्जन्माची कल्पना फार छान आहे त्यामुळे मी पुढच्या जन्मात कधीतरी पाणिनीची अष्टाध्यायी, पतंजलीचे महाभाष्य इत्यादी शिकेन हे स्वप्न आता शेवटपर्यंत पैलतीरावरून खुणावत राहणार हे निश्चित !
गजानन गुर्जरपाध्ये
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा