शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०

तीन तासिका

चांगले शिकवणे म्हणजे काय ?केवळ नव्या शिक्षकालाच नव्हे तर मला अजूनही या प्रश्नाचे निश्चित उत्तर देता येणार नाही .पण माझ्या लक्षात राहिलेले मला आवडलेले काही नमुने सांगतो . 
एकशे अठरा मुलांचा वर्ग पूर्ण भरलेला . साठी पार केलेले सर वर्गाच्या दाराशी येऊन क्षणभर थांबले .सर्वांचे चेहरे फुललेले पण टाचणी  पडली तर ऐकू येईल इतका शांत वर्ग , सरानी  नाकावर चष्मा नीट बसवत आणि  उजव्या हाताची तर्जनी वरच्या ओठाच्या किंचित वर  आणि उरलेली बोटे हनुवटीशी घेतलेली , दोन्ही बाजूच्या बाकांवर हसरी नजर फिरवत प्रत्येकाकडे पुस्तक, वही आहे की  नाही ते पाहत वर्गात प्रवेश केला . एखाद्या कसलेल्या नटाने एंट्री घ्यावी तसा हा शिकणे सुरु होण्यापूर्वीच शिकण्याला अनुकूल वातावरण निर्माण करणारा प्रवेश . अतिशयोक्ती करून सांगायचे तर  " नमयतीव गतिर्धरित्रीम् 'याची आठवण करून देणारा . त्यांचा प्रवेश हीच प्रस्तावना  
. तास संस्कृतचा. स्यन्दन शब्द आला . फळ्यावर छान पुरेशा मोठ्या अक्षरात संस्कृतच्या पद्धतीने शब्द लिहिला . ' ताई, तुम्ही उभ्या राहा आणि वाचा . "त्या मुलीने तो वाचला .तोच शब्द परत मराठीत लिहितात तसा लिहिला आणि  पुन्हा एकदा वाचायला सांगितला. वर्गावरून एकदा नजर फिरवीत एका मुलाला उभे केले . " भाऊ , हे दोन्ही शब्द सारखे आहेत की वेगळे ?जरा नीट बघून सांगा ". त्याने उजव्या हाताच्या शब्दात स्य वर टिंब आहे असे म्हटले . सगळा वर्ग हसला .. सरांच्या चेहेऱ्यावर स्मित .त्या मुलाला जराही न दुखावता सर म्हणाले ," बरोबर आहे पण या मुलाना तुम्ही अनुस्वार म्हटल असत तर हसायला संधी मिळाली नसती ". आणि इतर मुलांना उद्देशून म्हणाले ' " भाऊना मुद्दाम वेड पांघरून  ... " आणि मुलांनी आधी कधीतरी सांगितलेल्या 
म्हणीचा उपयोग करून  "पेडगावला जायची सवय आहे " असं त्यांचे वाक्य पूर्ण केले . संस्कृतमध्ये त्या अनुस्वाराऐवजी अनुनासिक लिहिण्याची पद्धत आहे . ते सर्व सांगून झाले आणि सर म्हणाले , " खूप वर्षांपूर्वी एका  वर्गात मास्तर शिकवत होते आणि एक मुलगा शेवटच्या बाकावर बसून वहीत पेन्सिलने काही तरी लिहित होता  त्या मुलाला मुखदुर्बळ असेच त्या मास्तरांनी नाव ठेवले होते . तर त्या मुलाने पुढे ' मुखदुर्बल ' या शीर्षकाची कविता लिहिली . त्या कवितेतली ओळ तुम्हाला सांगतो . ' माझ्या दुर्मुखल्या मुखातून पुढे चालावयाचा असे , सरसवाक् निष्यन्द चोहिकडे ..  " तो मुलगा काय म्हणतोय पाहा ' माझ्या या मुखातून रसाळ वाणीचा निष्यन्द म्हणजे ओघ पुढे वाहणार आहे .तो पिऊन तुमचे नातू पणतू तृप्त होतील .तेव्हा तुमचे नावही कोणाच्या लक्षात नसेल कदाचित . कोण होता हा मुलगा माहित आहे ? ". मुलांची  उत्सुकता क्षणात  शिगेला पोहोचली आणि सरानी कोणालाही माहित नसल्याची खात्री करून घेतल्यावर पुन्हा एकदा नाकावरील चष्मा नीट करीत नाव सांगितले " केशवसुत " . मग त्यांचे खरे पूर्ण नाव विचारून ज्या मुलाने "कृष्णाजी केशव दामले " असे सांगितले त्याला शाबा सकी देऊन पुन्हा श्लोकाकडे गाडी आली . व्यवहारात ज्याला पाल्हाळ , किंवा विषयांतर  म्हटले जाईल असे हे शिकवणे मला फार आवडले आणि मी त्याचे अनुकरण   देखील केले .

एका तालुक्याच्या ठिकाणच्या शाळेत  इंग्लिशचा तास चालू होता . टेनिसनची ' द ईगल ' कविता एक शिक्षक शिकवत होते . द रिंकल्ड सी बिनीथ हिम क्रॉल्स ' ही  ओळ शिकवत होते . त्यांनी  आपल्या कपाळाला हात  लावून  मुलांना  विचारले  ," What is this ? "एका मुलाने  forehead असे उत्तर दिले तेव्हा त्याला पूर्ण वाक्यात  "इट इज युअर फोरहेड " असे म्हणायला लावले . दर टप्प्याला कौतुक करत वेगवेगळ्या मुलांकडून उत्तरे घेत ते पुढे जात होते . मग कपाळावर आठ्या पाडून एका मुलाकडून दोज आर लाईन्स व युअर फोरहेड असे उत्तर आल्यावर ." दीज लाईन्स आर  कॉल्ड " म्हणत फळ्यावर wrinkles शब्द लिहिला . मुलांना त्याचा उच्चार कसा असेल त्याचा अंदाज करायला लावला . "यु नो द वर्ड write . द फर्स्ट लेटर इज सायलेंट , " असा क्लू देऊन विचार करायला लावले आणि उच्चार समजावून दिला . ट्विंकल .स्प्रिंकल वगरे अगोदर गेलेल्या शब्दांची आठवण देत स्पेलिंग पुरेसे ठसले याची खात्री झाल्यावर समेवर यावे तसे कवितेकडे आले . वेव्ज ऑफ द सी लुक लाईक रिंकल्स  फॉर द ईगल इस सिटिंग व द टॉप ऑफ द माउंटन असे सोप्या , सहज  इंग्लिशमध्ये  विवेचन चाललेले होते . मला हे आवडले पण असे शिकवणे जमायला खूप वर्षे जावी लागली .सोपे इंग्लिश बोलणे कठीण असते असे म्हणतात ते खरे आहे. 
एखादा शिक्षक अनुपस्थित असला की त्याच्या वर्गावर दुसर्या शिक्षकाला पाठवले जाते.त्याने शिकवावे अशी कोणाचीच अपेक्षा नसते .वर्गातील मुलांची तर नसतेच. मी अशा एका बुलेटीन पीरियडला गेलेल्या शिक्षकाचे शिकवणे पाहिले. लेंगा शर्ट घातलेले गुरुजी वर्गात शिरले. खेड्यातली शाळा होती ." गुरुजी , आम्ही अभ्यास करू आमचा ? " असे विचारून ' तुम्ही शिकवू नका ' असे सुचवण्याचे चातुर्य त्यांच्यात नव्हते .गुरुजीनी फळा पुसून स्वच्छ केला आणि फळ्यावर 2 × 2 लिहिले .एका मुलाला उभे करून उत्तर विचारले त्याने दिलेले उत्तर पुढे लिहिण्यापूर्वी छान वगैरे म्हणून त्याचे कौतुक केले .दुसर्या ओळीत आता त्यानी 3 × 3 लिहिले .आता एका मुलीने बरोबर उत्तर दिले .तिचेही ' अरे वा ' असे कौतुक झाले .वर्गाकडे पाहत आणि किंचित हसत म्हणाले , " आता मी काय विचारणार असेन?" मुलाना गंमत वाटत होती .अभ्यास चाललेला आहे असे वाटतच नव्हते ." गुर्जी मी सांगू ? " म्हणत कितीतरी हात वर झाले  होते .4 × 4 , 5 × 5 या क्रमाने दहापर्यंत गुणाकार लिहून फळा छान भरला .एकदा आपण सर्वांनी म्हणू या असे सुचवून बे दुणे चार , तीन त्रिक नऊ , चार चोक सोळा असे पठण झाले .शेवटच्या रकान्यात लिहिलेले आकडे गुरुजीनी अधोरेखित केले .त्या रकान्याच्या  वर लिहिले वर्ग.दोनाचा वर्ग किती ? अशा क्रमाने पुन्हा पठण झाले .वर्ग म्हणजे काय ? वर्गमूळ कशाला म्हणतात ? वर्गातल्या सगळ्या मुलाना कंटाळा न येता समजले होते .घंटा कधी वाजली कळले नाही. आणखी काय पाहिजे ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा