संस्कृतच्या पदवीधराला मराठी शिकवायला जमेल या समजुतीमुळे मला शाळेत मराठी विषय देण्यात आला . पंडिती काव्य शिकवताना संस्कृत उपयोगी पडते , मराठीतले बरेचसे शब्द संस्कृतमधून आलेले आहेत हे खरे असले तरी मराठी विषय वरच्या वर्गाना शिकवताना मला अवघडल्यासारखे वाटत असे .बरोबरच्या अनुभवी आणि नामवंत शिक्षकांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले नसते तर माझी फजिती झाली असती आणि मुख्य म्हणजे मला ते कंटाळवाणे वाटले असते .सगळे आता लक्षात नाही पण काही ठळक गोष्टी सांगतो .
कवितेचा अर्थ बऱ्यापैकी बुद्धिमान विद्यार्थ्यांना सहज समजण्यासारखा असेल तर आपण त्यांच्या आकलनात काय भर टाकणार हा मला प्रश्न पडत असे , कविता शिकवून संपली पण तास संपला नाही तर फारच बिकट अवस्था होईल . मराठीत काय शिकवता हो असे रावसाहेब पु ल ना विचारतात आणि पु ल देखील खरंच आहे ते असं म्हणतात हे ऐकायला ठीक आहे पण मोठ्या वर्गाला रोज सामोरे जावे लागणाऱ्या शिक्षकाला भेडसावणारे आहे . विद्यार्थी अगोदरच्या यत्तेत चांगल्या शिक्षकाकडे शिकून आलेले असतील , शिकवणी वर्गाला जात असतील ते नक्कीच आपले पाणी जोखतील आणि सुरुवातीला हे घडले तर आपण नकोसे आहोत हे मुलांच्या चेहेऱ्यावर दिसते , त्यांना आपल्या भावना लपवणे प्रयत्न करूनही जमत नाही .हे टाळण्यासाठी काय करता येईल असे मला सतत वाटे . हळूहळू मी काय शिकलो ते आठवते तसे सांगत आहे .
अमुक कवी शब्द बरोबर योजतो हे जाणवले तरी मुलांना पटवायचे कसे हे साधा वाटणारा प्रश्न आहे . आपण लिहायला बसलो की त्याच अर्थाचे अनेक शब्द आठवतात त्यापैकी एक आपण पसंत करतो ते का असा विचार मी केला आणि मुलांनाही करायला सांगितलं . अलीकडे आणि पलीकडे हे शब्द वाईट नाहीत . पण पलीकडे कावळा ओरडतोय हेच ज्ञानेश्वरांनी " पैल तो गे काऊ कोकताहे " या ओळीत सांगितले आहे ते आपल्याला गॊड वाटते . किंवा वसंत बापट यांच्या दक्खन राणी मधल्या , " ऐल ते पैल शंभर मेल , एकच बोगदा मुंबईपुण्यात " यात मैलच्या बरोबर ऐल,पैल जुळतात . कधीकधी अगोदर गद्य वर्णन सांगून मग कवितेतल्या ओली सांगितल्या तर मुलांना हा मुद्दा अधिक कळत असे .एका काठावर हिरवे गवत .पलीकडच्या दुसऱ्या काठावरही तसेच हिरवे गवत .आणि मधून पाणी वाहत आहे हे पहा आणि " ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन , निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटातून " हे पहा . गंगाधर गाडगीळांच्या लेखात ' घेऊन ' या शब्दाने झरा आणि हिरवळ यात नाते असल्याचे मी वाचले आणि माझ्या तंत्राने मी दोन चित्रे निर्माण करून म्हटले , " एक माणूस रस्त्याने चालला आहे . त्याचा डाव्या उजव्या बाजूला लोक आहेत हे एक चित्र . संध्याकाळी एक माणूस आपल्या दोन मुलांना घेऊन फिरायला चालला आहे हे चित्र
पाहा" खूप नंतर नरहर कुरुंदकर यांनी मराठी शिक्षकांसमोर बोलताना हा मुद्दा नेमक्या शब्दात मांडला . शब्द केवळ वस्तू किंवा व्यक्ती दाखवत नाही तर बोलणाऱ्याच्या भावना दर्शवतात . " आपली तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा ' या म्हणीत हे आलेलेच आहे पण आधी ते लक्षातं आले नव्हते . मराठी विषय घेऊन पदवी घेतलेल्या शिक्षकाच्या दृष्टीने हे साधेच आहे . मला ते कष्टाने आणि हळूहळू समजत गेले .
रुपारेल कॉलेजमध्ये प्रा. ल ग जोग आम्हाला शिकवत होते त्यांची उदाहरणे मार्मिक असत .जयोS स्तु ते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे या सावरकरांच्या ओळीत संस्कृत शब्द शोभून दिसतात कारण स्तोत्र संस्कृतमध्ये असणार असा संकेत आपल्या मनात आहे पण माधव ज्युलियन यांच्या कवितेत आलेले , " वन्दे त्वमेकँ अल्लाहू अकबर " हास्यास्पद ठरले हे त्यांनी दिलेले उदाहरण आठवते . जोग सरानी असेच एकदा दिलेले एक गमतीदार उदाहण आठवते . भा रा तांबे यांच्या कवितेत आई आपल्या मुलीचे वर्णन " मैद्यापरि विसविशीत सगळे "असे करते हे सांगून ते म्हणत '" मैदा हा स्वयंपाक घरातील एक पदार्थविशेष आहे आणि विसविशीत हा त्यावेळच्या बायकांच्या तोंडचा शब्द इथे अगदी योग्य वाटतो . संस्कृतमध्ये हे कानावर पडलेच नव्हते असे नाही .
माणूस जे जे करतो त्यात त्याचे अंतरंग प्रगट होत असते हे समजावून सांगताना मी सावरकर सशस्त्र क्रांतिकारक असल्याने त्यांच्या कवितेत स्वतंत्रता देवीला उद्देशून " अधमरक्तरंजिते " असे संबोधन आले आहे . हे सांगत असे . लेखनात लेखकाचे प्रतिबिंब कळतनकळत पडत असते हे मुलांना यावरून सहज लक्षात येई . शंकर वैद्य निषाद नावाच्या मासिकात कवितेविषयी नियमित सदर लिहीत असत त्यात त्यांनी बालकवी यांचे लक्ष लहान मुलासारखे भिरभिरते आहे हे श्रावणमासी हर्ष मानसी या कवितेचे विवेचन करताना छान मांडले होते ,क्षणात बालकवी पृथ्वीवरचे वर्णन करतात तर दुसऱ्याच ओळीत आकाशाकडे त्यांचे लक्ष गेलेले दिसते . या केवळ योगायोगाने वाचनात आलेल्या या लेखांनी मला दिशा दाखवली .. जुन्या पिढीतले एक नामवंत इंग्लिशचे प्राध्यापक आर के लागू यांनि संपादित केलेल्या ' ग्लीनिंग्ज फ्रॉम इंग्लिश लिटरेचर ' नावाच्या एका संग्रहात त्यांनी वर्डस्वर्थच्या डॅफोडिल्स या कवितेचे रसग्रहण या दृष्टीने वाचण्यासारखे आहे .
कविता ही एक एकसंध कृती असते .तिच्यात ऑरगॅनिक युनिटी असते हे माझ्या खूप उशिरा लक्षात आले . बा .भ बोरकर यांची महात्मा गांधीजींच्या संध्याकाळच्या प्रार्थनासभेचे वर्णन करणारी 'सायंप्रार्थना ' नावाची कविता शिकवत असताना मला ती एकदम जाणवली . व्यासवाल्मीकिंसारखे प्राचीन वैदिक काळातले ऋषी संध्याकाळी अस्ताला जाणाऱ्या सूर्याला अर्घ्य देत आहेत असे चित्र कवीच्या मनात पार्श्वभूमीसारखे असावे . कवितेतील पहिल्याच ओळीत आलेला सांध्यवंदना शब्द सूचक आहे . " आताच संपली सांध्यवंदना त्याची , जो नवयुगजनिता करुणामूर्ती दधीची ". दधीचीने आपली हाडे दिली ,इंद्राने त्यापासून वज्र बनवले आणि राक्षसांना मारले . संस्कृत शिकलेल्या माझ्या मनात त्वगस्थिमात्र ( केवळ त्वचा आणि हाडे शिल्लक राहिलेला ) ,तप:कृश वगैरे शब्द येणे साहजिक होते . इतिहासात वाचलेला ' गांधीयुग ' शब्द आठवून नवयुगजनिता हे विशेषण सार्थ वाटते . नदीत किंवा समुद्रात ऋषी अर्घ्य देतात त्यामुळे लाटा ,अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे त्यावर पडणारे किरण हे चित्रात येणे ओघाने आलेच ,त्यामुळे पुढच्या ओळी येतात . " जनलाटा हटल्या नटल्या तत्तेजाने , जणू कांचनरवीच्या स्पर्शे सागरवीची ".
सगळे लोक निघून जातात कवीला ऋषितुल्य गांधीजींबद्दल आदरच नव्हे तर पूज्यभाव असल्याने तो तिथेच थांबतो . " जन सर्व पांगला ,खिळलो मी परी धरणी , पदमुद्रा प्रभुच्या चुंबित अंतःकरणी " या ओळी सहज ,आपोआप आल्यासारख्या वाटतात हे वेगळे सांगायला नको . नवीन युग निर्माण करण्याची आणि त्यावर आपली मुद्रा टंकित करण्याची किमया त्यांनी केली . चालताना मागे पावलांचे ठसे उमटतात . चालणाऱ्याला त्याची जाणीव असेल किंवा नसेल . राजा आपली मुद्रा निर्माण करतो त्यापेक्षा हे अगदी वेगळे आहे . पदमुद्रा या शब्दात हीच गंमत आहे . मुद्रेचे सामर्थ्य ,सत्ता आहे पण ज्याची ती मुद्रा आहे त्याला त्याचे काहीच नाही . कवितेच्या एकात्मतेची जाणीव मला झाली . शिकवताना सोय म्हणून कविता कडवी,ओळी यात विभागलेली दिसली तरी ती आशय ,रचना याबाबतीत एकसंध असते म्हणून शिकवताना संपूर्ण कविता आधी वाचावी असे सांगतात .
सुरुवातीच्या काळात मला श्री, मुरलीधर जोशी याचे मार्गदर्शन मिळाले . कुसुमाग्रज हे त्यांचे आवडते कवी .सहज बोलताना त्यांनी एकदा ताजमहालवरील कवितेतल्या ओळी मला सांगितल्या . ताजमहाल म्हणजे ‘कुणी देवदूत वा फुलवुनी पंख फुलांचे ,तीरावर बसला कण मोजित शतकांचे’ या ओळी म्हटल्या .कण हा शब्द पाहा . शतक,शंभर वर्षे म्हणजे केवढा दीर्घ काळ पण ताजमहालाला शतक क्षुद्र कणाप्रमाणे वाटते . कलाकृती. कला कालजयी असतात हा सुचवलेला अर्थ त्यांनी लक्षात आणून दिला तेव्हा रीड बिट्विन द लाईन्स म्हणजे काय ते लक्षात आले . गिरगावच्या खेतवाडीतील युनियन हायस्कूलमध्ये ते शिक्षक होते .मराठी .इतिहास आणि इंग्लिश हे त्यांचे विषय .जुन्या काळातील बहुतेकांचे संस्कृत चांगले असे त्यामुळे ते संस्कृतही शिकवीत. आपल्याला आवडलेली वाक्ये ,कविता एका वहीत ते साक्षेपाने टिपून ठेवत.त्यांच्याबरोबरच्या गप्पा हे आनंददायी शिक्षण होते . आजही त्यांनी म्हटलेल्या कवितांच्या ओळी व वाक्ये आठवतात. ज्यांना शिकवण्यात रस आहे अशा अनुभवी शिक्षकांशी मैत्री करणे हे नव्याने शिक्षकी पेशात येणाऱ्या कोणालाही अत्यंत लाभदायी असते.’ माझिया जातीचे मज भेटो कोणी’ असे तुकारामाप्रमाणे प्रत्येकालाच वाटते.अशा समानशील व्यवसायबंधूबरोबरच्या गप्पा हे अनौपचारिक प्रशिक्षण असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा