बुधवार, १ जुलै, २०२०

Poetic Titbits

मी उगीच बसतो ट ला ट जुळवीत
कवितेला माझ्या यमकांनी खुणवीत 
ठाऊक मला जरी सर्वमान्य जनरीत 
ती मुक्तछंद गृही नांदत श्रीमंतीत 
        ×÷÷
पहिली मम कविताआठवते मज अजुनी
मरणाची केली होती आळवणी मी
वाऱ्याची यावी झुळुक शीळ घालीत 
हळुवार तसा तू ये मालवण्या मम ज्योत

       × ××
लेकरे झोपली निवांत सारे झाले
ओटीवर गप्पा सरल्या दीपहि विझले
शिणलेली गृहिणी मायेच्या पदराने
समईची मालवी ज्योत आठवणीने 
तू तसा येऊनि संपव आपुलकीने 
हे जीवनगाणे भैरवी आलापीने 
                    ×××
तोंडात घालता साखरदाणा एक
गोडवा पसरतो किती बरे निमिषात
मग गोड बोलणे मनापासुनी सांग
ऐकून किती भवताल सुखी होईल !
ऐकून प्रशंसा रोज मधुर शब्दात
मधुमेह कुणाला झाला काय जगात
बोलून गोड नित सुखवी जो  लोकांस
तो जनी जनार्दनपूजन करतो खास 
           ×××
ती गेली निघुनी मुक्तछंद उधळीत
मी होतो जेव्हा वृत्त तिचे जुळवीत
***
मी गेल्यावर जग सोडुनिया रम्य
फुलतील कोट्यवधी गुलाब उद्यानात 
परि ज्यांना ठाऊक मद्गुणसुमनसुगंध
ते येतिल जेथे चिरनिद्रित मी शांत.
--- मूळ उर्दू ओळींचा इ एम फोरस्टर यांनी आपल्या Passage to India कादंबरीत केलेल्या इंग्रजी अनुवादाचे हे मराठी रूपांतर.

निंदकाचे घर असावे शेजारी
त्याला कधी घरी आणू नये
आणू नये घरी आणले तरीही
शेजघरा त्याला नेऊ नये
नेले शेजघरी तरी अंगसंग 
संपला  अभंग भुका  म्हणे
भुका म्हणे ऐका याचे वर्म कोणा
अनुभवे विना  कळेचिना  !
 --- गजानन गुर्जरपाध्ये सप्टेंबर 2024
कसा जन्मला पहिला बाप
कुणी म्हणाले आपोआप 
नव्हता पाया ,जमीन भिंती
आभाळाला होती गळती
आदम होता तिकडे वरती  
इव्ह म्हणाली ती बघ धरती
बोअर झाले मी बघ पुरती
फिरून येऊ जरा खालती
पाहून घेऊ फिरती धरती
येथे आले स्वर्ग विसरले
मर्त्य मानवां जन्म देऊनि 
आईबाबा झाले चुकुनी 
---- गजानन गुर्जरपाध्ये

निश्चय केला एकच सारे फोल येथले उद्योग 
उपद्व्याप हे व्यर्थ कशाला कुणास त्याचा उपयोग ?
कुणी कुणाची बाजू घेऊन उगाच लिहितो काहितरी 
लग्न कुणाचे आणि नाचती उगाच हिजडे किती तरी! 3 Jan 2025