बुधवार, १ जुलै, २०२०

Poetic Titbits

मी उगीच बसतो ट ला ट जुळवीत
कवितेला माझ्या यमकांनी खुणवीत 
ठाऊक मला जरी सर्वमान्य जनरीत 
ती मुक्तछंद गृही नांदत श्रीमंतीत 
        ×÷÷
पहिली मम कविताआठवते मज अजुनी
मरणाची केली होती आळवणी मी
वाऱ्याची यावी झुळुक शीळ घालीत 
हळुवार तसा तू ये मालवण्या मम ज्योत

       × ××
लेकरे झोपली निवांत सारे झाले
ओटीवर गप्पा सरल्या दीपहि विझले
शिणलेली गृहिणी मायेच्या पदराने
समईची मालवी ज्योत आठवणीने 
तू तसा येऊनि संपव आपुलकीने 
हे जीवनगाणे भैरवी आलापीने 
                    ×××
तोंडात घालता साखरदाणा एक
गोडवा पसरतो किती बरे निमिषात
मग गोड बोलणे मनापासुनी सांग
ऐकून किती भवताल सुखी होईल !
ऐकून प्रशंसा रोज मधुर शब्दात
मधुमेह कुणाला झाला काय जगात
बोलून गोड नित सुखवी जो  लोकांस
तो जनी जनार्दनपूजन करतो खास 
           ×××
ती गेली निघुनी मुक्तछंद उधळीत
मी होतो जेव्हा वृत्त तिचे जुळवीत
***
मी गेल्यावर जग सोडुनिया रम्य
फुलतील कोट्यवधी गुलाब उद्यानात 
परि ज्यांना ठाऊक मद्गुणसुमनसुगंध
ते येतिल जेथे चिरनिद्रित मी शांत.
--- मूळ उर्दू ओळींचा इ एम फोरस्टर यांनी आपल्या Passage to India कादंबरीत केलेल्या इंग्रजी अनुवादाचे हे मराठी रूपांतर.

निंदकाचे घर असावे शेजारी
त्याला कधी घरी आणू नये
आणू नये घरी आणले तरीही
शेजघरा त्याला नेऊ नये
नेले शेजघरी तरी अंगसंग 
संपला  अभंग भुका  म्हणे
भुका म्हणे ऐका याचे वर्म कोणा
अनुभवे विना  कळेचिना  !
 --- गजानन गुर्जरपाध्ये सप्टेंबर 2024
कसा जन्मला पहिला बाप
कुणी म्हणाले आपोआप 
नव्हता पाया ,जमीन भिंती
आभाळाला होती गळती
आदम होता तिकडे वरती  
इव्ह म्हणाली ती बघ धरती
बोअर झाले मी बघ पुरती
फिरून येऊ जरा खालती
पाहून घेऊ फिरती धरती
येथे आले स्वर्ग विसरले
मर्त्य मानवां जन्म देऊनि 
आईबाबा झाले चुकुनी 
---- गजानन गुर्जरपाध्ये

निश्चय केला एकच सारे फोल येथले उद्योग 
उपद्व्याप हे व्यर्थ कशाला कुणास त्याचा उपयोग ?
कुणी कुणाची बाजू घेऊन उगाच लिहितो काहितरी 
लग्न कुणाचे आणि नाचती उगाच हिजडे किती तरी! 3 Jan 2025












शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०

तू दिलेले गीत माझे


ज्या  चाळीत माझे बालपण गेले आणि ज्या शाळेत मॅट्रिकच्या वर्षी(१९६१) मी होतो त्या दोन्ही ठिकाणी व्यवसायमार्गदर्शन हा शब्द कानावरही पडणे शक्य नव्हते मग शिक्षकाच्या  पवित्र ,उदात्त वगैरे व्यवसायात 'पड'ण्याचा किडा  माझ्या डोक्यात कसा शिरला त्याचे शक्य तेवढे खरे आणि तटस्थ असे हे टिपंण  ' स्वान्त:सुखाय ' करत आहे . 
शिवाजीपार्क परिसरातल्या लोकवस्तीत  सुस्थितीतल्या कुटुंबातली मुले बालमोहन किंवा किंगजॉर्ज (आताचे नाव राजा शिवाजी विद्यालय )येथे जात .. मी म्युनिसिपल शाळेत (त्यावेळी महापालिका शब्द रुळला  नव्हता )सातवीपर्यंत शिकून पायोनियर पब्लिक स्कुलमध्ये  दाखल झालो . कित्ते भंडारी हॉलच्या शेजारी असलेल्या चाळीत या शाळेच्या वर्गखोल्या होत्या .
आमच्या शाळेत शिक्षकदिन हा विद्यार्थीदिन  म्हणून साजरा केला जात असे .त्या दिवशी  दहावी अकरावीचे विद्यार्थी मुख्याध्यापक ,शिक्षक शिपाई बनून शाळेचे कामकाज चालवत असत . मी दहावीत असताना विद्यार्थीदिनात भाग घेण्यासाठी म्हणजे  शिक्षक होण्यासाठी नाव दिले त्याचे खरे कारण सांगायलाच हवे  कारण त्यातच पुढच्या सगळ्या कहाणीचे बीज नव्हे पण प्रारंभ आहे.  विद्यार्थीदिनात भाग घेतलेल्याना त्या दिवशी शाळा सुटल्यावरच्या शिक्षकसभेनंतर 'दत्तात्रेयचे बटाटेवडे मिळतात हे मी ऐकून होतो . दत्तात्रेय हॉटेल शाळेच्या समोरच होते आणि मोठ्या ,गरगरीत आणि चविष्ट वड्याबद्दल प्रसिद्ध होते . पैसा नजरेला सुद्धा पडायचा नाही त्यामुळे तिथे जाऊन वडे  खाणे  ही  अशक्य कोटीतली गोष्ट होती . तेव्हा या वड्याच्या आमिषाला मी किती सहज आणि तात्काळ बळी  पडलो असेन  याची कल्पना करा . याशिवाय फुलपॅण्ट घालण्याची संधीही पाहिल्यानेच या निमित्ताने मिळणार होती .माझे वडील म्युनिसिपल शाळेत प्राथमिक शिक्षक होते , सर्वात मोठा भाऊ मुंबईजवळच्या खेड्यात नव्याने निघालेल्या शाळेचा मुख्याध्यापक होता ,त्याची बायकोही त्याच शाळेत शिक्षिका होती . तेव्हा शिक्षकी पेशा रक्तात होता की  काय माहित नाही पण घरात होता हे नक्की . त्या विद्यार्थीदिनाला दहावीत मला उत्कृष्ट शिक्षक म्हणून बक्षिस मिळाले आणि माय फेट वॉज सील्ड . घरच्यांच्या शब्दात , " कानात वारे शिरले ". सेवानिवृत्त होऊनही आता  जवळजवळ पंधरा वर्षे होऊन गेली अजून ते वारं उतरलेलं नाही. 
मी आठवीपासून इंग्लिश शिकणाऱ्या पिढीतील आणि मॅट्रिकला ग्रेस मार्क धरून इंग्लिशमध्ये जेमतेम पस्तीस गुण  मिळून उत्तीर्ण झालो .शिकण्याची अजिबात आवड नव्हती .परीक्षेची तर भीतीच वाटत असे. त्यावेळी घराजवळच रुपारेल हे नव्याने सुरु झालेले कॉलेज होते त्यात मला विज्ञानशाखेत अनायासे प्रवेश मिळालेला होता पण मी तो बदलून आर्टस् ला बदलून घेतला कारण मॉर्निंग कॉलेजेस नव्याने सुरु झाली होती त्याचा वेळ सकाळी जेमतेम तीन तास त्यामुळे कॉलेजात जास्त वेळ अडकून  पडण्याची भीती नाही असा विचार मी केला.
कॉलेजमध्ये शिकत असताना सारख्या संस्कृत शिक्षक पाहिजेत अशा जाहिराती वाचून मी बी ला संस्कृत घेतले .पण मी पदवी घेतली आणि त्याच वर्षी शालेय अभ्यासक्रमातील संस्कृत गेले .संस्कृत पदवीधर मराठी सहज शिकवू शकेल अशी त्यावेळी मुख्याध्यापकांची समजूत होती .त्यांचा हा समज चुकीचा होता पण मला त्यामुळे नोकरी मिळाली .लवकरच माझ्या लक्षात आले की संस्कृतच्या ज्ञानाचा तेवढासा उपयोग रोजच्या मराठी अध्यापनात होत नाही. त्यावेळी मराठी शिकवणारे जे अनुभवी आणि यशस्वी शिक्षक माझ्या आसपास होते त्यांच्याकडून मी खूप शिकलो.त्यांचा मोठेपणा हा की त्यानी हातचे काही राखता त्यानी मला शिकवले .
 संस्कृत सारखेच पुढे मराठीचे झाले . मला मराठी अध्यापनात थोडीफार समज आणि गती येऊ लागली तेव्हा मी कोचिंग क्लासला पूर्णवेळ शिक्षक होतो . त्या दरम्यान नवगणित (मॉडर्न मॅथेमॅटिक्स ) आले . पालक आणि शिक्षक याना   एवढे टेन्शन आले कीं कोचिंग क्लासच्या वेळापत्रकात गणिताला जास्त तासिका देण्यासाठी मराठीला अर्धचन्द्र म्हणजे डच्चू मिळाला . कमी पगाराची असली तरी जास्त शाश्वती असलेली शाळेची नोकरी सोडल्याचा त्यावेळी पश्चात्ताप झाला की  नाही आता आठवतही नाही . कष्टाची बरी भाजीभाकरी अशी सरकारमान्य शाळेतली चाकरी कोचिंगक्लसच्या तूपसाखरेपेक्षा बरी हे साधे शहाणपण शिकायला  या स्वतःला यशस्वी शिक्षक समजणाऱ्या  शिक्षकाला बरीच वर्षे टक्केटोणपे खावे लागले , एकूण काय व्यवहारातले शहाणपण शिकणे कठीण आणि तुलनेने शाळेतले विषय  शिकवणे  सोपे असते हेच
खरे !  
आता आपद्धर्म म्हणून इंग्लिश शिकवणे भाग पडले .पण पत्रिकेत गुरु चांगला असावा कारण याही प्रसंगी जुन्या जाणत्या शिक्षकांनी मला साथ दिली ,सावरून घेतले आणि  'नदीमुखेनैव समुद्रमाविशत' म्हटलंय तसा मी इंग्लिश शिक्षक म्हणून बऱ्यापैकी नाव मिळवले . याला आणखी एक कारण होते . रुपारेलमध्ये शिकत असताना आम्हाला येवलेकर सर एफ वायला सिव्हिक्स आणि इंटरला इकॉनॉमिक्स शिकवत असत .त्यांनी एकदा मला प्रेमाने सांगितले , " मराठी काय केव्हाही वाचू शकशील तू .पण इंग्लिश मात्र आताच सवय लावून घेतलीस तरच .. ".त्यांचा उपदेश मी किती मानला ? मराठी वाचन बंद केले ., पेपरसुद्धा मराठी वाचता इंग्लिशच वाचायला लागलो .  इंग्लिशचा धाक कमी झाला .तरीपण इंग्लिशच्या तासाला पूर्ण तास  इंग्लिशच बोलायचे मला सुरुवातीला बरीच वर्षे  जमत नव्हते . इंग्लिश वाचनाची पार्श्वभूमी असल्याने फायदा झाला एवढेच .
शिकवण्याचे विषय बदलत गेले त्या प्रत्येक वेळी जड गेले परंतु " जे जे घडे ते स्वहित ' असे तुकारामांचे वचन मला शेवटी अनुभवाने पटले आहे . शेवटची दहा वर्षे मी इंग्लिश माध्यमाच्या शाळेत संस्कृत शिकवले . इंग्लिशमधून संस्कृत शिकवू शकत असल्यानेच मला तिथे नोकरी मिळाली . तिथे कोणालाही मी मराठी माध्यमात शिकलो आहे किंवा मराठी माध्यमातच अनेक वर्षे शिकवले असें असे कधी जाणवले नाही ही गंमतच वाटते . 
जरी मी बरीच वर्षे मराठी माध्यमातल्या मुलांना इंग्लिश शिकवले आणि सुमारे दहा वर्षे इंग्लिश माध्यमाच्या शाळेत संस्कृत शिकवले तरी मला वर्गाबाहेर अनौपचारिक इंग्लिश संभाषण किंवा ज्याला स्मॉल टॉक म्हणतात ते अजूनही जमत नाही . इंग्लिश सिनेमातले संवाद मला अजिबात  समजत नाहीत .पेपरात  येणारी  इंग्लिश शब्दकोडी  सोडवता येत नाहीत इंग्लिश शब्दांचे  शिष्टसंमत उच्चार  मी अभ्यासलेले नाहीत या उणीवा राहिल्या पण त्या असूनही  इंग्लिश शिक्षक म्हणून बऱ्यापैकी नाव मला मिळाले . इंग्लिश वाचन हा माझा हुकुमी विरंगुळा  आणि एकमेव 'प्लस पॉईंट बनला. संस्कृत मी आवडीने शिकलो.लहानपणी नको इतकी कीर्तनप्रवचने ऐकल्याने नकळत आणि सहज कितीतरी श्लोक ,सुभाषिते  सारखी कानावर  पडून त्यांचे नादमाधुर्य आणि अर्थसौंदर्य मनावर ठसले .  ती विनासायास आणि अर्थासह कायमची लक्षात राहिली . माझ्या वडिलांनी मला पूजा वगैरे शिकवली तेव्हा प्रत्येक पौराणिक मंत्राचा अर्थ सांगितला होता . आई जेमतेम मराठी चौथीपर्यंत गेली असेल पण तिचे वडील आणि काका संस्कृतचे जाणकार होते त्यामुळे तिच्या बोलण्यात ' अतिपरिचयादवज्ञा ' सारखी म्हणीवजा वापरली जाणारी संस्कृत वचने सहज येत . माझ्या वडिलांचे परिचित हर्डीकरशास्त्री म्हणून होते त्यांच्याकडे मी रघुवंशाचा दुसरा सर्ग म्हटला  ( शिकलो याचा हा पर्यायी शब्द  सर्वश्रुत होता  ) . प्रत्येक श्लोक अन्वय लावून शिकवताना त्या अनुषंगाने त्यांनी जे आणि जेवढे व्याकरण शिकवले तेवढी शिदोरी शेवटपर्यंत पुरली . पण मी पाणिनी शिकलो नाही त्यामुळे संस्कृतचे  ज्ञान ' पल्ल्वग्राही ' राहिले .तीनही भाषा शिकवायला भाग पडल्यामुळे इतर संस्कृत शिक्षकांच्या शिकवण्यापेक्षा माझे शिकवणे आपोआपच वेगळे झाले . त्या भाषांच्या पाठयपुस्तकातल्या साम्यस्थळांकडे माझे लक्ष गेले आणि त्याचा शिकवण्यात उल्लेख होऊ लागल्यावर मुलांना आश्चर्य वाटले . वादळ झाल्यावर आडवे पडलेले झाड पाहून एखाद्या ऋषीला उन्मूलयति शब्द सुचला आणि तिकडे युरोपात तसेच दृश्य पाहून अपरुट (uproot ) सुचला असेल असे ऐकल्यावर मानवी मन आणि त्याचे परिस्थितीला प्रतिसाद समान असतात हे वेगळे सांगायची गरज नाही . वेगवेगळे विषय म्हणजे अवतीभोवती पसरलेल्या जगाकडे पाहण्याच्या वेगवेगळ्या तऱ्हा आहेत, त्यात एकात्मता आहे . त्यांचे एकमेकांशी नाते  आहे ही कल्पना नवीन नाही पण मुलांना ती तशी वाटे . पृथ्वी सूर्याभोवती फिरते,तिच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याने दिवसरात्र होतात हा भूगोलातील धडा आणि पृथ्वीचे प्रेमगीत हो कविता ते त्याचे मोठे आणि ठळक उदाहरण नाही का ? पुण्य पर उपकार पाप ते परपीडा ही अभंगवाणी'परोपकार:पुण्याय पापाय परपीडनम् ' या व्यसनी सांगितलेल्या अठरा पुराणांच्या  
 सारांशापेक्षा वेगळी नाही . याहीपेक्षा त्यावेळी लोकप्रिय  असलेल्या पाडगावकरांच्या गाण्यातील  ओळ ' पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले ' आणि इंग्लिश पाठ्यपुस्तकातली वर्ड्सवर्थची  'ग्रीन फिल्ड स्लीप्स इन  सन ' यांची तुलना करून सांगितली की दोन्ही जीवनपद्धतीतला फरक आणि वेगळेपण लक्षात येते . माहेर ,सासर ,हिरवी साडी ,हळद ,माहेरवाशिण हे सगळे संदर्भ ( हळू हळू इथेही कोणाला कळेनासे होत चालले आहेत ) आणि क्वचितच सूर्यदर्शन होणाऱ्या युरोपमधील देशातली सूर्यस्नानाची चाल हे सर्व किती वेगळे आहे ! .संस्कृतचा शिक्षक मराठी हिन्दी चित्रपटातली गाणी आणि इंग्लिश कवितेच्या ओळी उद्धृत करतो हे मुलांनाही नवीन होते . केवळ दोन पिढ्यातले अंतर नाहीसे होऊन शिक्षणात रस निर्माण होण्यासाठी  हे मी करत होतों असे म्हणता येणार नाही . बरोबरच्या शिक्षकांपेक्षा आपण वेगळे आहोत असे दाखवून विद्यार्थीप्रियता मिळवण्याची ' चमकोगिरी ' देखील त्यामागे असेल , नव्हे  होतीच . सवंग लोकप्रियतेचा प्रयत्न म्हणून त्याची संभावनाहि मला सहन करावी लागली . 
त्या त्या वेळी मी जे इंग्लिश किंवा मराठी वाचत असे आणि मला विशेष आवडले असेल ते माझ्या शिकवण्यात येत असे . इन स्पाईट ऑफ शिकवताना मी इतरांप्रमाणे दो ,बट पासून सुरुवात करून जेव्हा इन स्पाईट ऑफ हिज बेस्ट क्वालिफिकेशन्स ,ही कुडन्ट गेट या जॉब सांगितले आणि त्यानंतर आपोआप टु सर विथ लव्ह या ब्रेथव्हाईट या आत्मकथनपर पुस्तकाची गोष्टही सांगितल्याचे मला आठवते . शाळेच्या वेळाव्यतिरिक्त जे जे मी केले त्याचे उपयोजन शेवटी वर्गात होत असे . विषयांतर जरूर होत असे पण अभ्यासक्रम ठराविक मुदतीत पूर्ण केला नाही असे कधी मी होऊ दिले नाही त्याअर्थी ते प्रमाणात केले जात होते हे निश्चित . वाचनाचा आणखी एक भाग इथेच सांगायला हवा . साहित्यात कितीतरी चांगल्या शिक्षकांची अतिशय प्रत्ययकारी चित्रणे आहेत .गुडबाय  मिस्टर   चिप्स टु यू सर चिप्स हि जेम्स हिल्टनची दोन पुस्तके , वर उल्लेख केलेले 'टु सर विथ लव्ह ,'लुई ऑचिन्क्लोस याचे रेक्टर ऑफ जस्टिन ' ही मला मार्गदर्शक वाटली . मराठीत श्री ना पेंडसे यांची 'हद्दपार ' , व्यंकटेश माडगूळकर यांची ' बनगरवाडी या कादंबऱ्या किंवा सविता भावे यांनी लिहिलेले नारळकरांचे " नाना ,एका पिढीचे शिल्पकार ' हे चरित्र ही  माझ्या लक्षात राहिलेली पुस्तके आहेत . शिक्षकांच्या उणिवा , मर्यादा यांचे उपहासपूर्ण चित्रणही वाचणे शिक्षकाला मार्गदर्शकच ठरते . ' बिगरी ते मॅट्रिक ' किंवा म्हैस मधील " इतकी चुकीची माहिती इतक्या आत्मविश्वासाने कोण सांगणार ? मास्तर , दुसरं कोण ?" हा बोचरा उल्लेख ,बटाट्याच्या चाळीतले कोचरेकर मास्तर ही  निगेटिव्ह चित्रणे आपण काय टाळायला हवे हे कळण्यासाठी वाचावीत . कॅचर इन राय मधील शिक्षकदेखील  याच दृष्टीने वाचनीय आहेत .' प्राईम ऑफ जीन ब्रूडी ' ही कादंबरी किंवा त्याच्यावर आधारित चित्रपट या दृष्टीने उल्लेखनीय आहे .  रामासारखे वागावे याबरोबरच रावणासारखे वागू नये हेसुद्धा रामायण सांगते तसेच  वाचनाचे आहे . शॉ चे दोज हू कॅन ,डू ; दोज हू कॅनॉट ,टीच ' हे तर मी कधीच विसरणार नाही .पुस्तकांची  ही  यादी संपणार नाही हेच खरे . 
ज्यांना शाळाकॉलेजात चांगले शिक्षक लाभतात ते शिक्षक होतात असे एक म्हटले जाते ते अर्धसत्य आहे .  कारण तसे झाले असते  तर शिक्षक होण्यासाठी उत्सुक पुष्कळ  तरुण दिसले असते  पण हे मात्र खरे आहे की  शिक्षक झाल्यावर आपण मागे वळून पाहतो आणि आपल्याला कोणते शिक्षक कोणत्या कारणांनी आवडले अजूनदेखील आपल्या  मूल्यमापनात तितकेच महत्त्वाचे कोण आहेत याचा  आढावा वेळोवेळी  प्रत्येकजण घेत  असावा , निदान तो घ्यावा हे मात्र निश्चित .तसेच  बरोबर काम करणाऱ्या शिक्षकांचे शिकवणे प्रत्यक्ष पाहणे शक्य नसले तरी कॉमनरूम मध्ये  कोणाचे बोलणे का ऐकत राहावे असे होते ते पाहणे सहज शक्य आहे . या संदर्भात अपवादात्मक दोन प्रकारची उदाहरणे मला आढळली .गमतीची म्हणून सांगतो . शिक्षकालयात कोट्या करून ,हुकुमी विनोद करून आम्हाला सतत हसत ठेवणारे एक सर वर्गात अतिशय गंभीरपणे  शिकवत असत . नव्याने लागलेल्या भूगोलाच्या शिक्षकाला  तो नकाशा घेऊन वर्गाकडे निघालेला पाहून जुने शिक्षक हसत म्हणाले , हे बघा नकाशा घेऊन चाललेत वर्गात . आज काय इन्स्पेक्शन वगैरे आहे की  काय ? " असे बोलणारे शिक्षक स्वतःमात्र नकाशा घेतल्याशिवाय भूगोलाच्या तासाला वर्गात कधीच जात नसत . अशा वातावरणात नवीन शिक्षकाचा गैरसमज होणे सहज शक्य असते . रूसोच्या वाक्यात फरक करून सांगायचे तर " डू ऍज दे डू अँड नॉट ऍज टे से ", असे सांगावे लागेल . 
मी जेव्हा शिक्षक होण्याचे ठरवले तेव्हा वेगवेगळ्या लोकांनी माझ्याशी बोलताना या व्यवसायाबद्दल मला काय काय सांगितले ते मला आठवते . पहिल्याने मी ज्या ठिकाणी पूर्णवेळ शिक्षक म्हणून नोकरी केली तिथल्या मुख्याध्यापकांनी माझी सर्टिफिकेट्स वगैरे पाहता मला  एकच प्रश्न विचारला , " मग काय तुम्ही खड्ड्यात पडायचे ठरवलेच आहे का ? ". ते अत्यंत यशस्वी ,मेहनत घेऊन शिकवणारे शिक्षक होते हे सांगायला हवे . सिनिसिझम हे फसवे बाह्यांग होते पण अंतरंग विद्यार्थ्यांविषयी खऱ्या खुऱ्या  कळकळीने ओतप्रोत भरलेले होते . माझे वडील प्राथमिक शिक्षक होते त्यांनी मला म्हटले '" शिक्षक व्हायला हरकत नाही पण फार पैसे मिळणार नाहीत आणि श्रेयही क्वचितच मिळेल ."तेही अतिशय तळमळीने शिकवत असत आणि आपल्यात शिक्षक म्हणून जे काही चांगले आहे ते त्यांच्याकडून आलेले आहे असे मला नेहमीच वाटत आले आहे . रुपारेलमध्ये मराठीचे प्राध्यापक असलेले . . जोग एकदा सहज ओघात म्हणाले , " शिक्षक झाल्याबद्दल  एकदाही चुकूनही  मला वाईट वाटलेले नाही ". मला स्वतःला काय वाटते ? कवीचे शब्द उसने घेऊन सांगावेसे वाटते : जाहल्या काही चुका अन सूर काही राहिले , तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले . "